Headlines

अवघ्या 2 मुलांपासून सुरू झालेला थक्क करणारा प्रवास!:तब्बल 100 हून अधिक दिव्यांगांचे आयुष्य बदलणाऱ्या 'विहंग' शाळेची मन हेलावून टाकणारी गोष्ट!




कुणी स्वतःच्या विश्वात रमलेले, कुणी अचानक रडू लागलेले, तर कुणी रागाच्या भरात समोरच्याला मारण्यासाठी धावणारे…प्रत्येक मुलाची गरज वेगळी, त्याची समज वेगळी आणि व्यक्त होण्याची पद्धतही वेगळी. अशा मुलांना सांभाळणे, त्यांना शिकवणे आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देणे हे खरोखरच संयमाचे काम आहे. मात्र, याच संयमाला आपल्या कामाची ताकद बनवणारे काही शिक्षक छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. कमलनयन बजाज रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या सावित्रीबाई फुले विहंग शाळेत दिव्यांग मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम केले जाते. केवळ अक्षरओळख करून देणे किंवा पुस्तकी शिक्षण देणे एवढाच या शाळेचा उद्देश नाही, तर प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न येथे केला जातो. शाळा म्हंटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या वर्गखोल्या, फळा, खडू, पुस्तकं, दप्तर आणि बाकांवर बसून शिकणारी मुलं. शिक्षकांनी शिकवलेला धडा समजून घेणं, गृहपाठ करणं, परीक्षा देणं आणि पुढच्या वर्गात जाणं, हे शालेय शिक्षणाचं सर्वसाधारण चित्र. मात्र, प्रत्येक मुलासाठी शिक्षणाची पद्धत एकसारखी असू शकत नाही. काही मुलांना अक्षरं ओळखायला वेळ लागतो, काहींना बोलून व्यक्त होता येत नाही, तर काही मुलांना चालण्या-फिरण्यासाठीही मदतीची आवश्यकता असते. काही मुलांची एकाग्रता टिकवून ठेवणे कठीण असते, तर काही मुलांना आपल्या भावना नियंत्रित करता येत नाहीत. अशा प्रत्येक मुलाची गरज समजून घेऊन त्याला शिकवण्याची पद्धत बदलावी लागते. हीच गोष्ट सावित्रीबाई फुले विहंग शाळेत प्राधान्याने केली जाते. दिव्य मराठी डिजिटलच्या ज्ञानदीप या सीरिजमध्ये जाणून घेऊयात या शाळेचा आगळा-वेगळा प्रवास. प्रत्येक मूल वेगळे, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी! या शाळेत साधारण 8 वर्षांपासून ते 25 वर्षांपर्यंतची मुले शिक्षण घेत आहेत. बोलतांना अडचण, चालतांना अडचण, ओव्हरॲक्टिव्ह, हायपर असलेली किंवा दैनंदिन मदतीची गरज असलेली मुले येथे येतात. प्रत्येक मुलाची शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि व्यावहारिक क्षमता वेगळी असते. तसेच त्यांची गरजही वेगळी आहे. त्यामुळे त्यांना एकाच पद्धतीचे शिक्षण देणे थोडे कठीण जाते. हे लक्षात घेऊन शाळेने नऊ वेगवेगळे वर्ग तयार केले आहेत. याबाबत सांगताना शाळेचे समन्वयक रतन पवार सांगतात, ‘सावित्री बाई फुले महिला एकात्म मंडळ यांच्या अंतर्गत ही शाळा चालते. सध्या आपल्या शाळेत एकूण 103 मुलं असून यामध्ये शिशू गट, प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी यांच्यानुसार क्लासेसची सुरुवात आहे. दिव्यांगांमध्ये जे प्रकार येतात त्यात १) सेरेब्रलपाल्सी (शारीरिक हालचाल आणि स्नायूंवरील नियंत्रण) २)ऑटिझम (सामाजिक संवाद, वर्तन आणि आवडी) ३) मल्टिपल डिसॅबिलिटी ( दोन किंवा अधिक प्रकारच्या दिव्यांगत्वांचा एकत्रित परिणाम) ४) डाऊन सिंड्रोम (गुणसूत्रांमधील बदलामुळे शारीरिक व बौद्धिक विकास) आणि ५) इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी (बौद्धिक क्षमता आणि दैनंदिन व्यवहार कौशल्ये) या प्रकारची मूल आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाची गरज वेगवेगळी आहे. कोणाला जेवण करता येत नाही, कोणाला चालता येत नाही. काहींना टॉयलेटला जायचं भान राहत नाही, तर काहींना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला एकाच ठिकाणी शिकवण थोडं कठीण जात. म्हणून त्यांची नऊ वर्गात विभागणी केली आहे. आपण त्यांच्या ॲबिलिटीनुसार वर्गात समावेश करतो.’ ते पुढे सांगतात, ‘या मुलांना जो सिलॅबस शिकवला जातो तो साधारणपणे चार- पाच डोमेन्स मध्ये चालतो. जस की वैयक्तिक,सामाजिक, शैक्षणिक, ओकेजनल आणि मनोरंजक असे आहेत. त्यानुसार त्यांना ट्रेनिंग दिली जाते. तसेच त्यांच्याकडून विविध ॲक्टिव्हिटी करून घेतली जाते. दिवाळी, राखी यासारख्या सणांमध्ये विविध वस्तू तयार करून घेतल्या जातात आणि त्याचे स्टॉल मुलांकडूनच लावले जातात. मग त्यामध्ये त्या वस्तू कश्या विकायच्या याच ट्रेनिंग दिल जातं.’ या शाळेत शिक्षणाची पद्धत वेगळी आहे. इथे मुलाने किती मार्क्स आणले किंवा शाळेत कोणता मुलगा किंवा मुलगी पहिली आली यापेक्षा त्या मुलाला (मुलीला) स्वतःहून किती गोष्टी करता येतात याला अधिक महत्त्व आहे. या मुलांसाठी स्वतःचे कपडे घालणे, जेवण करणे, स्वच्छता राखणे, इतरांशी संवाद साधणे या गोष्टीही शिक्षणाचाच महत्त्वाचा भाग आहेत. पुस्तकांच्या पलीकडचे शिक्षण; जगण्याचे धडे! या शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक. मुलांना स्वयंपाकघरातील वस्तूंची ओळख करून देण्यापासून ते साधे पदार्थ तयार करण्यापर्यंतच्या गोष्टी शिकवल्या जातात. भाज्या ओळखणे, साहित्य गोळा करणे, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचा वापर समजून घेणे आणि पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे, अशा कृतींतून मुलांना प्रशिक्षण दिले जाते. यातून केवळ स्वयंपाक शिकवला जात नाही, तर स्वतःची कामे स्वतः करता यावीत याची क्षमता वाढवली जाते. एखाद्या मुलाला स्वतः तयार केलेली वस्तू दुसऱ्याला विकता आली, त्यातून मिळालेले पैसे मोजता आले किंवा स्वतःच्या गरजेची वस्तू दुकानातून खरेदी करता आली, तर त्याच्यासाठी हा मोठा आत्मविश्वासाचा टप्पा असतो. अशा छोट्या-छोट्या कृतींतून मुलांना समाजात स्वतंत्रपणे वावरण्यासाठी तयार केले जाते. थेरपीच्या माध्यमातून क्षमतांना बळ! या मुलांच्या शिक्षणात केवळ वर्गातील शिकवण्याला महत्त्व नाही, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचाही विचार केला जातो. त्यासाठी शाळेत फिजिओथेरपी आणि म्युझिक थेरपीसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. काही मुलांना शरीराची हालचाल करण्यासाठी अडचणी येतात. काहींच्या हालचालींमध्ये समन्वय नसतो, तर काहींना शारीरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी नियमित सरावाची गरज असते. अशा मुलांसाठी फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. त्यांच्या गरजेनुसार व्यायाम आणि हालचालींचा सराव करून घेतला जातो. यातून शारीरिक हालचाली अधिक चांगल्या प्रकारे करता याव्यात, त्यांना दैनंदिन कामांमध्ये मदत व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी फिजिओथेरपिस्टला बोलावून या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. दुसरीकडे, म्युझिक थेरपीच्या माध्यमातून मुलांना संगीताची ओळख करून दिली जाते. संगीत, ताल आणि लय यांच्या माध्यमातून त्यांना सहभागी करून घेतले जाते. काही मुलांना बोलून व्यक्त होता येत नसले, तरी संगीताच्या माध्यमातून ती वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकतात. त्यामुळे संगीत हा त्यांच्या अभिव्यक्तीचा एक मार्ग ठरू शकतो. शाळेतील म्युजिक थेरपिस्ट प्रथमेश महाजन सांगतात, ‘मुलांच्या आवडीनुसार आम्ही त्यांना ते वाद्य शिकवतो. काहींना तबला वाजवायला आवडतो तर काहींना टाळ, चिपळ्या वाजवायला आवडत. काहींना गायला आवडत त्याप्रमाणे त्यांची इथे ट्रेनिंग घेतली जाते आणि त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचं अटेन्शन तसेच त्यांना आनंद मिळावा यासाठी आपण ऑडिओ सेशन घेतो. त्यांनी स्टेबल बसावं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं हा या थेरपीच्या उद्देश असतो. यासाठी शास्त्रीय संगीतही त्यांना शिकवलं जात. विशेष म्हणजे मुलं हे खूप आवडीने करतात.’ या सगळ्या प्रक्रियेत प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष देणे आवश्यक असते. कारण एका मुलाला उपयोगी पडणारी पद्धत दुसऱ्या मुलासाठी तितकीच परिणामकारक असेल असे नाही. त्यामुळे मुलांच्या गरजेनुसार वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांना सांभाळणे म्हणजे संयमाची कसोटी! या शाळेतील शिक्षकांचे काम बाहेरून पाहताना जितके सोपे वाटते, प्रत्यक्षात ते तितकेच आव्हानात्मक आहे. कारण वर्गातील प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. एखादे मूल अचानक वर्गातून उठून बाहेर जाते, तर दुसरे एखाद्या कोपऱ्यात जाऊन रडत बसते. काही मुले स्वतःच्या विश्वात रमलेली असतात. काहींना राग आला की ती मारहाण करू लागतात. अशा वेळी शिक्षकांना केवळ शिकवून चालत नाही, तर मुलांच्या वागण्यामागचे कारणही समजून घ्यावे लागते. एखादे मूल अचानक रडू लागले, तर त्याला ओरडून शांत करता येत नाही. त्याच्या भावना समजून घ्याव्या लागतात. एखादे मूल रागावले, तर त्याला शिक्षा करण्यापेक्षा त्याला शांत करण्याचा आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग शिकवावा लागतो. काही वेळा एकाच गोष्टीसाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात. या मुलांना शिकवताना शिक्षकांचा संयम, सातत्य आणि संवेदनशीलता यांची खरी कसोटी लागते. काही मुलांना एखादी कृती समजण्यासाठी अनेक दिवस, तर काहींना अनेक वर्ष लागू शकतात. मात्र, शिक्षकांना प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करावी लागते. रतन पवार सांगतात की, ‘काही मुलांना फिट्स येतात. जर त्यांची वाढ चांगली झाली असेल आणि अचानक जर त्यांना फिट आली तर ते अगदी शून्यावर जातात. मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे संयम असावाच लागतो.’

या कामात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची तुलना न करणे. कारण प्रत्येक मुलाचा शिकण्याचा वेग वेगळा असतो. एका मुलाने आज स्वतःहून जेवण केले, तर दुसऱ्या मुलासाठी आज स्वतःच्या हाताने चमचा पकडणे हीदेखील मोठी प्रगती असू शकते. त्यामुळे इथल्या शिक्षकांसाठी प्रत्येक छोटा बदल महत्त्वाचा असतो. मुलांपेक्षा पालकांना समजावणे अधिक कठीण! या शाळेतील शिक्षकांच्या मते, मुलांना सांभाळण्यापेक्षा त्यांच्या पालकांना समजावणे अनेकदा अधिक कठीण ठरते. कारण प्रत्येक पालकाला आपले मूल इतर मुलांप्रमाणे वाढावे, शिकावं आणि आयुष्यात पुढं जावं असं वाटत असत. मात्र, आपल्या मुलाला विशेष गरजा आहेत, त्याच्या विकासासाठी वेगळ्या पद्धतीची मदत आवश्यक आहे, हे स्वीकारणे काही पालकांसाठी कठीण असते. शाळेचे प्रिंसिपल प्रशांत सोमवंशी सांगतात, ‘काही पालक आपल्या मुलाला दिव्यांगत्व किंवा विशेष गरजांची समस्या आहे, हे मान्य करण्यास तयार नसतात. त्यांना वाटते की काही दिवसांत किंवा एखाद्या उपचारानंतर त्यांचे मूल पूर्णपणे बरे होईल आणि इतर मुलांप्रमाणे वागू लागेल. तर काही पालकांना आपल्या मुलाने लगेच सुधारणा करावी, अशी अपेक्षा असते. मुलाच्या क्षमतेनुसार त्याला वेळ देण्याऐवजी त्याच्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्या जातात. त्यासाठी आपण पालकांचे समुपदेशन करतो. तसेच दिव्यांगाबद्दलची जागरूकता करतो. बऱ्याचदा वैद्यकीय इमर्जन्सी येते. आम्ही हेडगेवार रुग्णालयाशी संलग्न आहोत. त्यामुळे जर कुठली इमर्जन्सी आली तर आम्ही मुलांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करतो.’ प्रत्येक मुलाचा विकास हा त्याच्या स्वतःच्या गतीने होत असतो. त्यासाठी वेळ, सातत्य आणि योग्य वातावरण आवश्यक असते. ही गोष्ट पालकांना समजावून सांगणे गरजेचे असते. कारण मुलाच्या विकासाच्या प्रक्रियेत शाळेइतकीच घरातील वातावरणाचीही महत्त्वाची भूमिका असते. पालकांनी आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांच्या क्षमतांचा स्वीकार करावा, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या छोट्या-छोट्या प्रगतीचे कौतुक करावे, हा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा हेतू असतो. कारण शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा सराव घरी झाला, तर मुलांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. मुलांचे संगोपन करताना पालकही अनेकदा मानसिक तणावातून जात असतात. आपल्या मुलाचे भविष्य काय असेल, ते मोठे झाल्यानंतर स्वतःची काळजी घेऊ शकेल का, समाजात कसे वावरू शकेल, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. अशा वेळी पालकांनाही मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. त्यामुळे या शाळेचे काम केवळ मुलांपुरते मर्यादित राहत नाही, तर पालकांनाही या प्रवासाचा भाग बनवले जाते. दोन मुलांपासून 103 मुलांपर्यंतचा प्रवास! 2011 मध्ये अवघ्या दोन मुलांपासून या शाळेची सुरुवात झाली. विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रवास आज 103 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. ही शाळा आज अनेक कुटुंबांसाठी आशेचा आधार बनली आहे. वयाच्या 25 वर्षांपर्यंतची मुले येथे शिक्षण घेत आहेत. प्रत्येक मुलाची गरज, त्याची क्षमता आणि त्याच्या विकासाची पातळी लक्षात घेऊन त्याला प्रशिक्षण दिले जाते. या शाळेतील शंतनू महाजन म्हणतो, ‘मला मोठं होऊन एक चांगला फोटोग्राफर व्हायचं आहे. मला झाडांचे, फुलांचे सगळ्यांचे फोटो काढायला खूप आवडतात. शाळेत यायला खूप मज्जा येते. मी आता माझ्या पुढच्या शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी जाणार आहे.’ शंतनू सारखे या शाळेत अनेक मुलं आहेत ज्यांना मोठं होऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहायचं आहे. तसंच देवेंद्र या विद्यार्थ्याला मोठेपणी स्वतःच सलून टाकायची इच्छा आहे. या मुलांच्या विकासात इथल्या शिक्षकांचा मोठा हातभार आहे. ते घेत असलेल्या प्रयत्नामुळे अनेक मुलांच्या आयुष्यात बदल झाला आहे आणि होत आहे. एखादे मूल पहिल्यांदा स्वतःहून जेवते, एखादे स्वतःच्या पायावर उभे राहते, तर एखादे आपल्या मनातील स्वप्न शब्दांत व्यक्त करते. इतरांसाठी या छोट्या गोष्टी असतील, पण या मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी तो मोठा विजय असतो.
या शाळेतील मुलांना केवळ इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, तर त्यांना शक्य तितकी कामे स्वतः करता यावीत, हा प्रयत्न असतो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळावी, स्वतःच्या क्षमतांची जाणीव व्हावी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगता यावे, यासाठी शिक्षण दिले जाते. स्वीकार, संधी आणि स्वावलंबनाचा ध्यास! दिव्यांगत्व किंवा विशेष गरजा असणे म्हणजे एखाद्या मुलाच्या आयुष्याला पूर्णविराम मिळणे नव्हे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही गुण असतो. जो त्या ज्याच्या त्याच्या परीने स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. गरज असते ती त्या क्षमता ओळखण्याची, योग्य वातावरण देण्याची आणि त्याला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याची. सावित्रीबाई फुले विहंग शाळेचा प्रवास याच विचारातून पुढे जात आहे. इथे प्रत्येक मुलाकडे त्याच्या मर्यादांमधून नव्हे, तर त्याच्यात असलेल्या क्षमतांमधून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुलाला जे शक्य नाही, त्यापेक्षा त्याला काय शिकता येऊ शकते, यावर भर दिला जातो. त्याला इतरांसारखे बनवण्यापेक्षा त्याच्या क्षमतेनुसार स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. कारण इथे प्रत्येक दिवस हा नव्या शिकण्याचा असतो. प्रत्येक छोटा प्रयत्न हा प्रगतीचा असतो आणि प्रत्येक छोट्या यशामागे असते ती अनेक दिवसांची मेहनत. मुलांच्या आयुष्यातील अडचणी एका दिवसात दूर होणार नाहीत, याची जाणीव असूनही त्यांना शक्य तितके स्वतंत्र बनवण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. शेवटी, या मुलांना समाजाच्या सहानुभूतीपेक्षा स्वीकाराची आणि दयेपेक्षा समान संधीची अधिक गरज आहे. कारण प्रत्येक मुलाला स्वतःच्या पद्धतीने शिकण्याचा, व्यक्त होण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. त्यांना कमी लेखण्याऐवजी त्यांच्या क्षमतांना ओळखले, तर कदाचित उद्या याच मुलांमधून एखादा उत्तम फोटोग्राफर, एखादा यशस्वी व्यावसायिक किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणारी व्यक्ती घडेल. त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम विहंग शाळेतील शिक्षक करत आहेत. म्हणूनच, या शाळेतील प्रत्येक छोट्या यशामागे शिक्षकांचा संयम, पालकांचा विश्वास आणि मुलांची जिद्द यांची एक सुंदर गोष्ट दडलेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *