![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या अपघातामागे घातपात असल्याची शंका व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण करणार असलेला खुलासा आश्चर्यकारक असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले. रोहित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, रामदास कदम यांनी नेमके काय आरोप केले, हे आपण ऐकलेले नाही. मात्र काही लोकांनी फोन करून अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणात सुनील तटकरे यांचे नाव जोडल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने व्हायला हवा, त्या पद्धतीने होत नसल्याची आपली तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले. तपासाच्या दिशेवर रोहित पवारांचे प्रश्न अजित पवार यांच्या अपघाताबाबत घातपाताची शंका असल्याचे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. तपास संथ गतीने सुरू असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही या शंकांचे निरसन होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील नागरिकांच्या मनात या अपघाताबाबत संभ्रम असल्याचा दावा करत, मोठ्या प्रमाणावर लोकांना ही केवळ दुर्घटना नसून घातपात असण्याची शंका वाटत असल्याचे रोहित पवार म्हणाले. या प्रकरणात एफआयआर दाखल होण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तपास योग्य दिशेने होत नसेल, तर या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कोण वाचवत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, दिवाळीनंतर 14 किंवा 15 नोव्हेंबरला मुंबईत आपले महत्त्वाचे प्रेझेंटेशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दिवसांपासून या सादरीकरणाची तयारी सुरू असून त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशामुळे अजित पवार यांच्या अपघाताबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाच्या चर्चेत माझ्याशी संवाद नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. विलीनीकरणाची चर्चा प्रत्यक्षात सुरू असती, तर आपल्याशीही त्याबाबत संवाद झाला असता, असे रोहित पवार म्हणाले. सध्या ही चर्चा प्रामुख्याने अजित पवार यांच्या पक्षात आणि माध्यमांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या पक्षात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रामदास कदमांना केवळ आरोप न करता पुरावे देण्याचे आवाहन रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना रोहित पवार यांनी त्यांना पुरावे समोर आणण्याचे आवाहन केले. अजित पवार यांच्या निधनानंतर काही मोजकेच नेते या विषयावर सातत्याने राजकीय विधाने करत होते. त्यामध्ये रामदास कदम आणि कर्जतचे आमदार यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले. सत्ताधारी गटातील नेत्यांपर्यंत या प्रकरणासंदर्भात काही वेगळी माहिती पोहोचली आहे का, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की, केवळ एखाद्याचे नाव घेऊन आरोप करण्यापेक्षा संबंधितांनी त्यांच्याकडे असलेले पुरावेही सार्वजनिक करावेत. असे पुरावे मिळाल्यास अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवरही उपस्थित केले प्रश्न शरद पवार यांच्या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. 10 नोव्हेंबर रोजी प्रफुल्ल पटेल शरद पवार यांची भेट घेणार का, याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पटेल यांनी यापूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पीएच्या मोबाईलवरून व्हिडिओ चित्रित करून तो बाहेर पाठवला होता, असा दावा रोहित पवार यांनी केला. ही भेट केवळ शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती की त्यामागे पक्षांतर्गत राजकारणाचा काही हेतू होता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या भेटीमुळे सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. तटकरे-पटेल यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या नियंत्रणावरूनही गंभीर आरोप केले. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. मात्र, मुंबईतील पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण काही पुरावे मांडले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यातील उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद यांपैकी एखादे पद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही त्यांनी केला. आपण पुरावे समोर आणल्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, असे रोहित पवार म्हणाले. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी केलेल्या विधानांमध्ये आता बदल केला असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षात या नेत्यांची भूमिका आणि प्रभाव याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एकीकडे अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावरून रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतची भूमिका आणि सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोप यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. आता 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी रोहित पवार नेमके कोणते पुरावे आणि कोणते मुद्दे मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार:विरोधकांच्या मोर्चाला हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला त्यांचा चेअरमन करण्यासाठी हजर राहण्याची गरज काय? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड महायुतीच्या बाजूने होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चावर टीका करताना, “आम्ही विरोधी पक्षात आहोत. लोकांनी आम्हाला विरोधी पक्षाचा मॅन्डेट दिला आहे. मग त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आमच्या 12 संचालकांनी उपस्थित का राहायचे?” असा सवाल त्यांनी केला. सविस्तर वाचा….
Source link
शरद पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया:अजितदादांच्या अपघाताबाबत 14-15 नोव्हेंबरला मोठा खुलासा करणार