Headlines

अमृता फडणवीसांनी भाऊबिजेला बोलावलं नाही, तरी ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार:मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य चर्चेत




मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्याला भाऊबीजेसाठी घरी बोलावले नसले, तरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भाऊबीज पाठवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस यांनाही भाऊबीज पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आरक्षण, मराठा समाजाची एकजूट, लाडक्या बहिणींची दिवाळी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. अमृता फडणवीसांना भाऊबीज पाठवणार मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अमृता फडणवीस यांनी त्यांना भाऊ मानत घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी आंदोलन सुरू असल्याने आपण मैदानात असताना अशा पद्धतीने बोलावणे योग्य नाही, असे जरांगे यांनी म्हटले होते. आंदोलन संपल्यानंतर भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन अमृताताईंच्या भेटीला जाईन, असेही त्यांनी सांगितले होते. आता यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता जरांगे यांनी वेगळी भूमिका मांडली. आपल्याला अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेसाठी बोलावले नसले, तरी आपण आपल्या परिस्थितीनुसार त्यांना भाऊबीज पाठवणार आहोत. सुनेत्राताई आणि अमृताताईंनाही ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे. बंजारा समाजानेही एकजूट दाखवावी; आरक्षणाची मागणी जरांगे पाटील यांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले. बंजारा समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी येण्याचे भाग्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी असून हा परिसर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. समाजाच्या प्रगतीसाठी व्यसनांपासून दूर राहून एकजूट टिकवणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. बंजारा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका आपण यापूर्वीच मांडली असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. बंजारा समाजातील तरुणांनी केवळ ऊसतोडीचे कामच करायचे का? त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचे नाही का? मराठा आणि बंजारा समाजातील तरुणांनी आयुष्यभर ऊसाच्या मळ्यातच काम करत राहायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजातील मुलांना शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या संधी मिळाल्या पाहिजेत. आरक्षणामुळे त्यांना पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. आपण मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम केले असून बंजारा समाजानेही आपला इतिहास समजून घेत एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. लाडक्या बहिणींच्या दिवाळीवरून एकनाथ शिंदेंना सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी शिंदे यांच्या उपक्रमाचे स्वागत केले. लाडक्या बहिणींच्या दारात जाऊन दिवाळी साजरी करणे ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले. मात्र, याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. आरक्षणाअभावी मराठा समाजातील तरुणांचे मृत्यू होत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा सवाल त्यांनी केला. केवळ दिवाळी साजरी करून चालणार नाही, तर आरक्षणासाठीही ठोस निर्णय होणे गरजेचे असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला. गोकुळच्या राजकारणावर बोलण्यास नकार गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी हा राजकीय विषय असल्याने आपण त्यावर भाष्य करणार नसल्याचे सांगितले. मात्र, राज्यातील जनतेमध्ये विविध मुद्द्यांवरून प्रचंड असंतोष असल्याचे त्यांनी नमूद केले. 500 कोटींच्या ऑडिओ टेप प्रकरणावर रामदास कदमांना सल्ला राज्यात 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ टेप प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी या प्रकरणात भाजपच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. याबाबत जरांगे यांना विचारले असता, रामदास कदम यांच्याकडे काही पुरावे असतील म्हणूनच ते बोलत असतील, असे त्यांनी म्हटले. त्यांच्याकडे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे असतील, तर त्यांनी ते समोर आणावेत, असेही जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे पोहरादेवीच्या दर्शनानंतर जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्यातील राजकीय घडामोडींवरही आपली भूमिका स्पष्ट केली. हेही वाचा…. लातूरमध्ये मालमत्तेच्या वादातून पित्यानेच केली 7 वर्षीय मुलाची हत्या:सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा मालमत्तेच्या वादातून एका पित्यानेच आपल्या 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. पहिल्या पत्नीच्या दोन मुलांना मालमत्तेचा वाटा दिल्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही संपत्तीत हिस्सा मिळावा, अशी मागणी होत होती. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून संतापलेल्या पित्याने दुसऱ्या पत्नीच्या पोटच्या मुलाला घरातून बाहेर नेले आणि त्याची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलाचा मृतदेह घरामागील शेतातील नाल्यात टाकून तो पसार झाला. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी वडील युसूफ मुबारक सय्यद (वय 58) याला अटक केली आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *