Headlines

लातूरमध्ये मालमत्तेच्या वादातून पित्यानेच केली 7 वर्षीय मुलाची हत्या:सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा




मालमत्तेच्या वादातून एका पित्यानेच आपल्या 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. पहिल्या पत्नीच्या दोन मुलांना मालमत्तेचा वाटा दिल्यानंतर दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही संपत्तीत हिस्सा मिळावा, अशी मागणी होत होती. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून संतापलेल्या पित्याने दुसऱ्या पत्नीच्या पोटच्या मुलाला घरातून बाहेर नेले आणि त्याची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुलाचा मृतदेह घरामागील शेतातील नाल्यात टाकून तो पसार झाला. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी वडील युसूफ मुबारक सय्यद (वय 58) याला अटक केली आहे. मालमत्तेच्या वाटणीवरून पती-पत्नीत वाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ मुबारक सय्यद याला दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले असून, दुसऱ्या पत्नीपासून एक 7 वर्षांचा मुलगा आहे. पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलांना युसूफने मालमत्तेत वाटा दिला होता. मात्र, दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही मालमत्तेत समान वाटा मिळावा, अशी तिची मागणी होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. दुसऱ्या पत्नीचा हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे आपल्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यालाही मालमत्तेत हिस्सा मिळावा, अशी तिची भूमिका होती. मात्र, या मागणीवरून निर्माण झालेला कौटुंबिक वाद टोकाला गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच वादातून युसूफने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. रात्री मुलाला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला 5 नोव्हेंबरच्या रात्री युसूफ आपल्या 7 वर्षीय मुलाला सोबत घेऊन घरातून बाहेर पडला. मात्र, बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत. रात्रभर पती आणि मुलाची वाट पाहिल्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्यांचा शोध सुरू केला. दोघांबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने तिने पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी युसूफ आणि मुलाचा शोध सुरू केला. दरम्यान, 7 नोव्हेंबर रोजी युसूफ परभणी शहरात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्यासोबत मुलगा नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. मुलगा कुठे आहे, याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांनी युसूफ घरातून बाहेर पडल्यापासूनच्या हालचालींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महत्त्वाचा पुरावा तपासादरम्यान पोलिसांनी युसूफच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात 5 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास युसूफ आपल्या मुलाचा हात धरून घरामागील सुळ गल्ली परिसरातील शेताच्या दिशेने जाताना दिसून आला. विशेष म्हणजे, काही वेळानंतर तो त्याच ठिकाणाहून एकटाच परत येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या फुटेजमुळे पोलिसांना तपासाची महत्त्वाची दिशा मिळाली. मुलाला सोबत घेऊन गेलेला युसूफ परतताना एकटाच का आला, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींच्या आधारे त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून माहिती मिळवली आणि मुलाच्या बेपत्ता होण्यामागील संशयास्पद बाबी स्पष्ट झाल्या. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला. घरामागील शेतातील नाल्यात आढळला मृतदेह दरम्यान, बेपत्ता असलेल्या 7 वर्षीय मुलाचा शोध सुरू असतानाच रविवारी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह घरामागील शेतातील नाल्यात आढळून आला. मृतदेहाची अवस्था कुजलेली होती. त्यामुळे मुलाची हत्या 5 नोव्हेंबर रोजीच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह शेतातील नाल्यात टाकण्यात आल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एका निष्पाप बालकाचा जीव त्याच्याच पित्याने घेतल्याच्या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी पित्याला अटक; पोलिसांकडून पुढील तपास या प्रकरणी पोलिसांनी युसूफ मुबारक सय्यद याला अटक केली आहे. मालमत्तेच्या वाटणीवरून दुसऱ्या पत्नीशी होत असलेल्या वादातून त्याने मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या चौकशीतून या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी, घटनाक्रम आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा…. गोकुळवर प्रशासक आणणे हे सरकारचे सूडबुद्धीचेच राजकारण:कोल्हापुरात संघर्ष मोर्चातून सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ५ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आज कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या ‘संघर्ष मोर्चा’त काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जातीवादाचा आणि घराणेशाहीचा आरोप करत थेट हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारने गोकुळमध्ये सूडबुद्धीने प्रशासक आणल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *