![]()
मुंबईकरांसाठी पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाच्या उभारणीच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी) हद्दीतील तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याचा प्रस्ताव असून, या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी विभागाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या मुलुंडच्या रोपवे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या रोपवे प्रकल्पाची मागणी केली होती. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून डोंगरमाथ्यावरील तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारल्यास परिसरातील पर्यटनाला चालना मिळू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. आता या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे. मुलुंड ते तारामती माता मंदिरापर्यंतच रोपवे या प्रस्तावित रोपवेबाबत सध्या विविध चर्चा सुरू असताना आमदार मिहिर कोटेचा यांनी प्रकल्पाची व्याप्ती स्पष्ट केली आहे. हा रोपवे मुलुंड ते बोरिवली असा मोठ्या अंतराचा किंवा व्यावसायिक स्वरूपाचा प्रकल्प नसणार आहे. तो केवळ मुलुंड परिसरापुरताच मर्यादित राहणार आहे. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील तारामती माता मंदिरापर्यंतच रोपवेची जोडणी प्रस्तावित आहे. त्यामुळे मुलुंड ते बोरिवली रोपवे होणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे कोटेचा यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रियेचे स्वागत करताना कोटेचा म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून डोंगरमाथ्यावरील निसर्गरम्य परिसरात असलेल्या तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याचे आश्वासन दिले होते. या माध्यमातून परिसरातील पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे. आता या प्रकल्पाचा वास्तुरचनात्मक आराखडा तयार करण्यासाठी पीडब्ल्यूडीने सल्लागार नियुक्तीची निविदा काढली आहे. ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरमाथ्यावर निरीक्षण मनोरा उभारण्याचा प्रस्ताव या रोपवे प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोंगरमाथ्यावर निरीक्षण मनोरा (ऑब्झर्व्हेटरी) उभारण्याचा प्रस्ताव आहे. या मनोऱ्यावरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तीर्ण परिसर आणि लगतच्या तुळशी तलावाचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे. सध्या मुंबईच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची संधी मर्यादित आहे. अशा परिस्थितीत रोपवे आणि निरीक्षण मनोऱ्याच्या माध्यमातून मुंबईकरांना निसर्गपर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. रोपवेच्या माध्यमातून पर्यटकांना तारामती माता मंदिरापर्यंत सहज पोहोचता येईल. त्याचबरोबर डोंगरमाथ्यावरून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हिरवळ, डोंगररांगा आणि तुळशी तलावाचा परिसर अनुभवता येईल. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गपर्यटनालाही या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वन आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्या महत्त्वाच्या मात्र, रोपवे प्रकल्पाची अंमलबजावणी लगेच सुरू होणार नाही. सर्वप्रथम सल्लागारामार्फत प्रकल्पाचा सविस्तर वास्तुरचनात्मक आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीशी हा प्रकल्प संबंधित असल्याने वनक्षेत्र, पर्यावरण आणि वन्यजीवांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करणे आवश्यक ठरणार आहे. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे आमदार कोटेचा यांनी स्पष्ट केले. सल्लागाराला करावी लागणार विविध प्रकारची सर्वेक्षणे पीडब्ल्यूडीने काढलेल्या निविदेनुसार, नियुक्त करण्यात येणाऱ्या सल्लागाराला प्रकल्पाच्या विविध तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे. रोपवेसाठी सर्वाधिक योग्य मार्ग कोणता असेल, त्यासाठी किती जमिनीची आवश्यकता भासेल आणि कोणत्या ठिकाणी स्थानके उभारता येतील, याचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारण्यात आलेल्या रोपवे प्रकल्पांचाही संदर्भ घेतला जाणार आहे. याशिवाय प्रस्तावित मार्गावर भूपृष्ठीय सर्वेक्षण, भू-तांत्रिक तपासणी, भू-मापनविषयक सर्वेक्षण आणि जलविषयक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणांची प्राथमिक पाहणी करून प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीचा अभ्यासही केला जाईल. रोपवेची संपूर्ण यंत्रणा कशी असेल, त्याचा मार्ग कोणत्या पद्धतीने निश्चित करावा, तसेच सुरुवातीचे आणि शेवटचे स्थानक नेमके कुठे असावे, याबाबत सल्लागाराला तांत्रिक शिफारशी कराव्या लागणार आहेत. प्रकल्पाचा खर्च आणि पर्यावरणीय परिणामांचाही अभ्यास रोपवे उभारण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याचा अंदाज तयार करणे हीदेखील सल्लागाराची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, स्थानकांची उभारणी, रोपवेची यंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबींचा विचार करून संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च निश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम होईल, वनक्षेत्रावर किती प्रभाव पडेल आणि वन्यजीवांच्या अधिवासावर कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे, याचाही सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे केवळ रोपवे उभारण्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यावरणीय निकषांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेही ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईच्या पर्यटनाला मिळणार नवा पर्याय सध्या मुंबईत एकही रोपवे कार्यरत नसल्याचे सांगत आमदार मिहिर कोटेचा यांनी या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुलुंडमधील नागरिकांसह मुंबई आणि परिसरातील पर्यटकांना तारामती माता मंदिर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेण्याची नवी सुविधा उपलब्ध होऊ शकते. मात्र, प्रकल्पाचा सविस्तर आराखडा, अपेक्षित खर्च आणि आवश्यक सरकारी परवानग्या या बाबी पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू झालेली सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हेही वाचा…. अमृता फडणवीसांनी भाऊबिजेला बोलावलं नाही, तरी ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार:मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य चर्चेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्याला भाऊबीजेसाठी घरी बोलावले नसले, तरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भाऊबीज पाठवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस यांनाही भाऊबीज पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आरक्षण, मराठा समाजाची एकजूट, लाडक्या बहिणींची दिवाळी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सविस्तर वाचा…..
Source link
मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाचा मार्ग मोकळा:मुलुंड ते तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याच्या हालचालींना वेग