![]()
शहर व उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रॉकेट व आकाशात उडणारे तत्सम फटाके नजिकच्या इमारतींच्या छत, बाल्कनी, खिडक्यांमध्ये तसेच ज्वलनशील साहित्यावर पडून आग लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती, उंच इमारती, झोपडपट्टी क्षेत्र, अरुंद रस्ते आणि निवासी व व्यावसायिक इमारतींची मोठी संख्या लक्षात घेता, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ४१ (ए) (सुधारित), कलम २६ (२), कलम ३० व ३४ (एम) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, अध्यक्ष, शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी या नियमांचे आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून जारी निर्देशांनुसार, निवासी इमारती, इमारतींचे टेरेस, गच्ची, बाल्कनी, अंगणे, वाहनतळ, झोपडपट्टी क्षेत्रे तसेच इतर सर्व परिसरांना ही बंदी लागू राहणार आहे. हे आदेश दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ पासून दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्त, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभागांचे (वार्ड ऑफिस) सहायक आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Source link
ठाण्यानंतर आता मुंबईत रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी:वाढत्या आगीच्या घटनांनंतर महापालिकेचा निर्णय, नियमांचे पालन करण्याचे आवाहन