Headlines

संविधानाच्या मागण्यांसाठी पुण्याहून नागपूरपर्यंत पदयात्रा:15 नोव्हेंबरपासून अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली 763 किमीचा मार्च; हिवाळी अधिवेशनात विधानभवनासमोर निदर्शने




मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने संविधानातील मूलभूत अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या मागण्यांसाठी पुणे ते नागपूर ७६३ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या ‘संविधान सन्मान लॉन्ग मार्च’चे नेतृत्व मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार करणार आहेत. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनासमोर शांततापूर्ण निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल, अशी माहिती इनामदार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. धर्माच्या नावावर वाढणारी सामाजिक तेढ, द्वेषपूर्ण भाषणे, धार्मिक स्थळांबाबतचे वाद, जमावाकडून होणारी हिंसा आणि धर्मांतराच्या आरोपांवरून दाखल होणारे गुन्हे यामुळे अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा दावा इनामदार यांनी केला. कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या विरोधात नव्हे, तर संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी पदयात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात, एसआयआर प्रक्रिया रद्द करून २०२५ पूर्वीच्या मतदार याद्या पुन्हा लागू कराव्यात, द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांवर निष्पक्ष कारवाई करावी, धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे आणि मॉब लिंचिंगच्या घटना रोखाव्यात, अशा मंचाच्या मागण्या आहेत. दहशतवादाच्या आरोपांखाली अटक होऊन नंतर निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई आणि पुनर्वसन द्यावे, अशीही मागणी आहे. कथित ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराच्या आरोपांवरून दाखल प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, वक्फ मालमत्तांचे संरक्षण करावे आणि समान नागरी कायद्याबाबत सर्व धर्मांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, असे मंचाने म्हटले आहे. १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रा सुरू होईल. पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चिखली, खामगाव, अकोला, बडनेरा आणि अमरावतीमार्गे पदयात्रा नागपूरला पोहोचेल. पदयात्रेच्या प्रारंभाला माजी खासदार मोहम्मद अदीब, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आमदार रोहित पवार, विश्वजीत कदम, अबूआसिम आझमी आणि केरळचे आमदार चांडी ओम्मेन उपस्थित राहणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय धर्मगुरूही उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला इब्राहिम शेख, लुकस केदारी, नदीम मुजावर, सादिक शेख, अल्ताफ शेख, सिद्धार्थ ओव्हाळ, मेहबूब शेख, मुनाफ शेख आणि रफीक तुर्क उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *