Headlines

नवस फेडण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची 80 हजारांची सोन्याची पोत लंपास:भरदुपारी दोघांचा डाव, वैजापूर तालुक्यातील घटना




मंदिरात नवस फेडायचा असल्याचे सांगत दोन भामट्यांनी 70 वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथे घडली. विशेष म्हणजे, गावाच्या मध्यवर्ती भागातील महादेव मंदिर परिसरात भरदुपारी 12 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी नवस फेडण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 7 ग्रॅम वजनाची, 80 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोर दहेगावचे माजी पोलीस पाटील दत्तात्रय उगले यांच्या पत्नी रुख्मिणबाई दत्तात्रय उगले (वय 70) या सोमवारी दुपारी गावातील महादेव मंदिर परिसरात होत्या. यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी रुख्मिणबाई यांच्याशी संवाद साधत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आजीने येथील महादेव मंदिरात नवस कबूल केला आहे. तो नवस आम्हाला फेडायचा असून, त्यासाठी तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत काही वेळासाठी द्या, असे त्यांनी सांगितले. अनोळखी व्यक्तींनी सांगितलेल्या या गोष्टीवर विश्वास ठेवून वृद्ध महिलेने त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर चोरट्यांनी नवस फेडण्यासाठी तुमची सोन्याची पोत आम्हाला द्या, आम्ही देवाजवळ ठेवून जातो, तुम्ही नंतर घेऊन जा, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रुख्मिणबाई यांनी गळ्यातील सोन्याची पोत त्यांच्याकडे दिली. मात्र, पोत हातात पडताच दोघांनी तेथून काढता पाय घेतला. काही वेळानंतर रुख्मिणबाई महादेव मंदिरात गेल्या असता, देवाजवळ आपली सोन्याची पोत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून गावातून पसार झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, दोघेही दुचाकीवरून वेगाने गावातून बाहेर पडल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले. गावाच्या मध्यवस्तीतच चोरट्यांचा धाडसी डाव बोर दहेगावमधील महादेव मंदिर परिसर हा गावाच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात आहे. येथे दिवसा नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्यांनी वृद्ध महिलेला लक्ष्य केले. धार्मिक भावना आणि नवस फेडण्याच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांनी चोरीचा हा प्रकार केला. विशेष म्हणजे, पीडित महिला या गावच्या माजी पोलीस पाटलांच्या पत्नी असल्याने या घटनेची परिसरात अधिक चर्चा होत आहे. भरदिवसा, लोकवस्तीच्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ दरम्यान, बोर दहेगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दसरा सणाच्या दिवशीही गावातील रमेश पंडित यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता. मात्र, घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. त्यानंतर आता थेट गावाच्या मध्यवस्तीत भरदुपारी वृद्ध महिलेची सोन्याची पोत लंपास करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये भीती; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी एकीकडे रात्रीच्या वेळी घरफोडीचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे दिवसा नागरिकांची फसवणूक करून दागिने चोरण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्ती धार्मिक विधी, नवस किंवा अन्य कारणे सांगून दागिने मागत असल्यास नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हेही वाचा…. गोकुळचा निकाल येण्याआधीच हसन मुश्रीफांकडून राजेश पाटलांच्या नावाची घोषणा:अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल हाती येण्यापूर्वीच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली आहे. भरसभेत राजेश पाटील यांचे नाव घेत मुश्रीफांनी त्यांचे अभिनंदन केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *