Headlines

अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम:विखेंच्या अध्यक्षतेखालील दुसरी बैठकही निष्फळ, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा




जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसून, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ऊसदर निश्चित करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली दुसरी बैठकही कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. त्यामुळे ऊसदराचा तिढा कायम असून शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याचे निर्देश विखे यांनी साखर कारखान्यांच्या चेअरमनना दिले आहेत. मात्र, या मुदतीत निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील ऊसाचे काटे, साखर कारखाने आणि प्रमुख महामार्ग बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऊसदराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांकडून ऊसदर निश्चित करण्याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन ते तीन साखर कारखान्यांचे चेअरमन उपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांशी चर्चा करून ऊसदराचा निर्णय घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. कारखानदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी वाढली आहे. बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. वारंवार बैठका होऊनही ऊसदराचा प्रश्न मार्गी लागत नसेल, तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखान्यांच्या चेअरमनना उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता उद्याच्या बैठकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत कारखानदार एकमताने निर्णय घेतात का आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, उद्या सायंकाळपर्यंत ऊसदराचा निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. ऊसाचे वजन करण्याचे काटे बंद पाडण्यासह साखर कारखान्यांचे कामकाज रोखणे आणि जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता आंदोलनाच्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेही वाचा…. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात:म्हणाले- स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार करतायत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे. या पुस्तकात आणीबाणी आणि बाबरी मशीद पतन यांसारख्या मुद्द्यांवर केलेल्या उल्लेखांवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर घणाघाती टीका केली आहे. “जेव्हा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा पुस्तके लिहून जनतेत कन्फ्युजन तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *