Headlines

पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची तलवार-कोयत्यांनी वार करून हत्या:हल्ल्याचा थरार CCTV मध्ये कैद, कुर्ल्यातही गोळीबारात एकाचा मृत्यू




पुणे आणि मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार प्रकाश ऊर्फ लाल्या येवले याची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात अडवून तलवार, कोयते आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला केला. या संपूर्ण हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज समोर आले आहे. दुसरीकडे, मुंबईतील कुर्ला परिसरातही जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात विनोद पवार यांचा मृत्यू झाला. एकाच वेळी दोन मोठ्या शहरांमध्ये घडलेल्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोथरूडमध्ये लाल्या येवलेला रस्त्यात अडवून हल्ला पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात शनिवारी (8 नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. प्रकाश ऊर्फ लाल्या येवले हा दुचाकीवरून परिसरातून जात असताना तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याला अडवले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार, कोयते आणि लोखंडी हत्यारांसह लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी येवले याला लक्ष्य करून बेदम मारहाण केली. धारदार शस्त्रांनी केलेल्या वारांमुळे तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच परिसरात गस्त घालत असलेले कोथरूड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील येवले याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर या हत्येच्या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्लेखोरांनी प्रकाश येवले याला रस्त्यात अडवून त्याच्यावर हल्ला केल्याचे या फुटेजमधून समोर आले आहे. त्यामुळे या घटनेने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. प्रकाश ऊर्फ लाल्या येवले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून, हत्येमागील नेमके कारण काय, हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता आणि या कटामागे आणखी कोणी आहे का, याचा तपास सुरू आहे. मुंबईतील कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार; विनोद पवार यांचा मृत्यू पुण्यातील हत्येच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच मुंबईतील कुर्ला परिसरातही गोळीबाराची घटना घडली. कुर्ल्यातील हलाव पूल परिसरात जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. तीन ते चार जणांनी विनोद पवार यांना गाठून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. कुर्ल्यातील हलाव पूल परिसरापासून काही अंतरावर माकडवाला कंपाउंड आहे. या भागात संबंधित दोन्ही गटांतील सदस्य राहत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही गट एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वाद आणि वर्चस्वाच्या संघर्षातून यापूर्वीही हिंसक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्ष झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावरून बंदूक जप्त; फॉरेन्सिक पथकाकडून तपास गोळीबाराची माहिती मिळताच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपास सुरू केला. घटनास्थळावरून एक बंदूक जप्त करण्यात आली असून, या बंदुकीचे दृश्यही समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात आले. या गोळीबारामागील नेमके कारण काय, आरोपींनी कोणत्या शस्त्राचा वापर केला आणि या हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. दोन शहरांत हिंसक घटनांनी चिंता वाढवली पुण्यात सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्रांनी हत्या आणि मुंबईतील कुर्ल्यात गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू, अशा दोन गंभीर घटना समोर आल्याने राज्यातील शहरी भागांमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पूर्ववैमनस्य, टोळ्यांमधील संघर्ष आणि वैयक्तिक वादातून थेट हत्या व गोळीबारासारख्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घटनांमधील आरोपी, हल्ल्यामागील कारणे आणि संभाव्य कट यांचा तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा…. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात:म्हणाले- स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार करतायत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वादळ उठले आहे. या पुस्तकात आणीबाणी आणि बाबरी मशीद पतन यांसारख्या मुद्द्यांवर केलेल्या उल्लेखांवरून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर घणाघाती टीका केली आहे. “जेव्हा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा पुस्तके लिहून जनतेत कन्फ्युजन तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे,” असा थेट आरोप बावनकुळे यांनी केला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *