Headlines

मेकअप आर्टिस्टच्या घरात कोकेनचा साठा:साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त




मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका 31 वर्षीय तरुणाला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी मेकअप आर्टिस्ट असून त्याने स्वतःच्या मालाडमधील घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा मोठा साठा लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी छापा टाकून हा साठा जप्त केला. या प्रकरणाचा तपास पुढे नेत पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदारालाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह मुद्देमालाची एकूण किंमत 21 कोटी 13 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगावमध्ये संशयास्पद हालचाली, पोलिसांनी घेतले ताब्यात बांगूरनगर पोलिसांना गोरेगाव परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लिंक रोडवरील शिवम सोसायटी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद हालचाली करत असलेला फुलचंद ईश्वरदयाल कश्यप (वय 31) हा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 6 ग्रॅम कोकेन आणि मोबाईल फोन आढळून आला. या कोकेनची बाजारभावानुसार किंमत सुमारे 3 लाख 36 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. मालाडमधील घरावर छापा; पोटमाळ्यावर लपवला होता साठा फुलचंद कश्यप याची चौकशी केली असता त्याच्या मालाडमधील मढ व्हिलेज येथील घरात कोकेनचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी घरातील पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले तब्बल 672 ग्रॅम कोकेन पोलिसांच्या हाती लागले. घरात अशा प्रकारे अमली पदार्थांचा साठा लपवून ठेवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपीकडून एकूण 678 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्यासोबत मोबाईल फोन आणि इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 3 कोटी 38 लाख 98 हजार 500 रुपये असल्याची माहिती आहे. झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने आरोपी कोकेन विक्रीच्या व्यवसायात उतरल्याचा संशय पोलिसांना आहे. मेकअप आर्टिस्टच्या व्यवसायाच्या आडून ड्रग्जचा व्यवहार? या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला फुलचंद कश्यप हा मेकअप आर्टिस्ट असल्याची प्राथमिक माहिती आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असताना तो अमली पदार्थांच्या विक्रीतही सहभागी असल्याचे तपासातून समोर आले आहे. मात्र, तो स्वतः या व्यवसायात किती काळापासून सक्रिय होता, त्याला कोकेनचा पुरवठा कोण करत होते आणि त्याचे ग्राहक कोण होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. साथीदार मुजाहिद अलीलाही अटक; 21.13 कोटींच्या साठ्याचा तपास या प्रकरणाचा तपास सुरू असताना फुलचंद कश्यप याचा साथीदार मुजाहिद अली याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोन्ही आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची एकूण किंमत 21 कोटी 13 लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलचंद कश्यप याला बोरिवलीतील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आता या दोघांना कोकेनचा पुरवठा करणारी व्यक्ती कोण, हा साठा मुंबईत कुठे आणि कोणाला विक्री केला जाणार होता, तसेच या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून अमली पदार्थांविरोधात ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. घराच्या पोटमाळ्यावर कोकेनचा साठा लपवून ठेवणाऱ्या मेकअप आर्टिस्टच्या अटकेमुळे शहरातील ड्रग्ज तस्करीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हेही वाचा…. मराठा बांधवांसाठी मनोज जरांगेंनी हेल्पलाईन क्रमांक केला जारी:तरुणांना मराठा सेवक होण्याचे आवाहन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांसह इच्छुक नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. मराठा समाजातील मुलांचे भविष्य, समाजाची प्रगती आणि समाजातील एकजूट कायम राखण्यासाठी राज्याच्या प्रत्येक गावात आणि घराघरात मराठा सेवक तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर आपली माहिती पाठवावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *