Headlines

दौड आणि सोल्जरॅथॉनसाठी पहाटेपासून मेट्रो धावणार:15 नोव्हेंबरला पुण्यात पहिली मेट्रो 3:40 वाजता; सर्व मार्गांवर 20, तर जिल्हा न्यायालयातून दर 10 मिनिटांनी फेऱ्या




पुण्यात रविवारी (१५ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’ (रन फॉर युनिटी) आणि ‘सोल्जरॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या सोयीसाठी पुणे मेट्रोची सेवा पहाटे ३ वाजून ४० मिनिटांपासून सुरू करण्यात येणार आहे. धावपटूंना स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे, यासाठी मेट्रो प्रशासनाने नियमित वेळापत्रकात बदल करून विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या दिवशी पहाटे ३.४० ते सकाळी ६ या वेळेत पुणे मेट्रोच्या सर्व मार्गांवर दर २० मिनिटांनी गाड्या धावतील. रामवाडी, वनाज, पीसीएमसी आणि स्वारगेट या चार टर्मिनल स्थानकांवरून पहिली मेट्रो पहाटे ३.४० वाजता सुटेल. याशिवाय जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावरून वनाज आणि पीसीएमसीच्या दिशेने दर १० मिनिटांनी अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना लोकमान्य टिळक चौक (अलका चौक) येथे पोहोचण्यासाठी वनाज मार्गिकेचा, तर सोल्जरॅथॉनच्या सहभागींसाठी पीसीएमसी मार्गिकेचा उपयोग करता येणार आहे. जिल्हा न्यायालय स्थानकावर मार्गिका बदलण्याची सुविधा उपलब्ध असल्याने दोन्ही मार्गांवरील प्रवाशांना पुढील प्रवास करणे सोयीचे होणार आहे. या विशेष नियोजनानुसार मार्गिका क्रमांक एकवर पीसीएमसी ते स्वारगेट आणि मार्गिका क्रमांक दोनवर वनाज ते रामवाडी या मार्गांवर दर २० मिनिटांनी मेट्रो धावेल. जिल्हा न्यायालय स्थानकातून पीसीएमसी आणि वनाजच्या दिशेने दर १० मिनिटांनी अतिरिक्त सेवा उपलब्ध असेल. राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि देशाच्या अखंडतेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन केले जाते. तर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोल्जरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळून धावपटूंना सुरक्षित आणि वेळेत प्रवास करता यावा, यासाठी मेट्रो प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केली आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *