![]()
उलवे परिसरामध्ये कमी पैशांमध्ये रूम देण्याचे आमिष दाखवून तब्बल 19 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला उलवे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश देवप्रभाकर द्विवेदी (रा. उलवे, पनवेल) असे आरोपीचे नाव असून, तो गुन्ह्यापासून लपत फिरत होता आणि सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकत होता. फसवणुकीची मोडस ऑपरेंडी आरोपीने ‘श्री. गुरू बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स’ या फर्मच्या माध्यमातून उलवे येथील सेक्टर 24 मधील एका इमारतीत कमी किमतीत रूम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. फिर्यादी विजय शंभूनाथ झा आणि इतर साक्षदारांकडून एकूण 19,00,000/- रुपयांची रक्कम उकळल्यानंतर त्याने फसवणूक केली. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 2023 चे कलम 316(2), 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना आव्हान आणि सोशल मीडियावर बदनामी गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना उघडपणे आव्हान देऊन पसार झाला होता. तो ट्विटर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकून पोलिसांची बदनामी करत महाराष्ट्रभर आपले अस्तित्व लपवून राहत होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे लोणावळ्यातून अटक उलवे पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा यशस्वी वापर करत, लोणावळा, जि. पुणे येथील एका हॉटेलमधून 12 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12.04 वाजताच्या सुमारास त्याला शिताफीने अटक केली. सराईत आरोपी शैलेश द्विवेदी याच्यावर यापूर्वीच खंडणी, शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा, धार्मिक भावना भडकवणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच नेरूळ, एनआरआय सागरी, रबाळे एमआयडीसी आणि कळवा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंद असून तो अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता.
Source link
स्वस्तात घर देण्याच्या आमिषाने 19 लाखांचा गंडा:पोलिसांना आव्हान देणाऱ्या भामट्याला उलवे पोलिसांकडून बेड्या