![]()
मुलांना अद्भुत रसाची प्रचिती दिल्यामुळे त्यांची बुद्धी, कल्पनाशक्ती तरल होते, त्यांचा मनोविकास साधला जातो त्याच वयात त्यांच्यासाठी अत्यंत शुष्क माहिती बालसाहित्यातून दिली जाणे हा मोठा प्रमाद घडलेला आहे. हा प्रमाद का घडला, कोणी घडविला, हेतूपुरस्सर झाला की नकळतपणे झाला हा मुद्दा वादाचा भाग आहे. परंतु सद्य स्थितीत बालसाहित्याची निर्मिती होताना साहित्यिक पुन्हा एकदा अद्भुत रसाकडे येऊ लागले आहेत ही सकारात्मक बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. कथेमधील घोड्यांना पंख असतात का या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे ही महत्त्वाची बाब आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. १४) पत्रकार भवन येथे भारत सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मोठ्यांसाठी साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिकांनी बालसाहित्य निर्माण करणे ही परंपरा मधल्या काळात खंडित झाली होती ती पुन्हा एकदा प्रस्थापित होताना दिसत आहे ही आनंददायक घटना आहे, असे सांगून भारत सासणे पुढे म्हणाले, बालमानस शास्त्रानुसार ज्या मुलांना अद्भुत रसाचे सेवन करता आले नाही ती मुले पुढे जाऊन अविकसित स्वरूपाची प्रौढ व्यक्ती बनते तसेच पोटार्थी होऊन त्यांच्यात शुष्कपणा येतो. त्यांच्या मनात कलांबद्दलचे प्रेम निर्माण होत नाही. म्हणून मुलांमधील कल्पनाशक्ती साहित्यकृतीतून तरल करणे, त्यात अद्भुत रस, प्रयोगशीलता आणि भवतालाचा विचार असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील बालसाहित्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साहित्यिक, प्रकाशक, शिक्षक आणि पालक यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचित केले. पुरस्काराला उत्तर देताना गणेश मतकरी म्हणाले, किशोरवयीन व पौंगडावस्थेत वाचनाची गोडी लागली तर ही सवय टिकू-वाढू शकते परंतु ती गोडी लावणारे साहित्य निर्माण करताना कल्पनाशक्तीला पंख देणाऱ्या साहित्याबरोबरच अत्यंत वास्तववादी साहित्य देखील लिहिले जाणे आवश्यक आहे. हे साहित्य निर्वात पोकळीतील नको तर त्याला मुलांच्या जगण्याचा जीवंत संदर्भ असावा.
Source link
भारत सासणे यांनी बालसाहित्यात कल्पनाशक्तीला महत्त्व दिले:‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कारांचे पुण्यात वितरण