Headlines

देणगी मागणाऱ्या दोन मूकबधिरांना मुलांचे अपहरणकर्ते समजून मारहाण:मोशीतील शिवाजीवाडीत दोघांना दोरीने बांधले; व्हिडिओ व्हायरल, दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा




उत्तर प्रदेशातील दोन मूकबधिर व्यक्ती मोशीतील सोसायटीत देणगी मागण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना मुलांना पळवून नेणारे समजून मारहाण करण्यात आली आणि दोरीने बांधून ठेवण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत मुलांना पळवून नेण्याचा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. मोशी मार्शल यांना डायल ११२ वर फोन करून शिवाजीवाडी येथे दोन संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवल्याची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा दोघांना दोरीने बांधले होते. चौकशीत ते मूकबधिर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अनसुल सोसायटीत नेले. सुरक्षा रक्षकाकडे केलेल्या चौकशीत दोघांनी प्रवेशद्वारावर नोंद करून सोसायटीत प्रवेश घेतल्याचे समजले. त्यांच्याकडे देणगी मागण्यासंबंधीचे पत्र होते. ते सोसायटीतील एका महिलेकडे देणगी मागत होते. अनोळखी व्यक्ती असल्याने त्या महिलेने सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. ही माहिती सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पसरल्यानंतर नागरिक जमा झाले. उमेश फडतरे यांनी दोघांची चौकशी केली आणि ते मूकबधिर असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे छायाचित्र सोसायटीच्या ग्रुपवर पाठवले. त्यांनी दोघे मूकबधिर असल्याचेही सांगितले. सोसायटीत अनोळखी व्यक्तींना प्रवेश कसा दिला, यावरून सुरक्षा रक्षकाला जाब विचारण्यात आला. तपासात सुरक्षा रक्षक लक्ष्मण हजारे आणि त्याचा मित्र प्रकाश चासकर यांनी दोघांना मारहाण करून सोसायटीबाहेर काढल्याचे समोर आले. पोलिसांनी अनुप कुमार आणि रॉकी कुमार (दोघेही रा. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश) यांच्यासह संबंधित नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दोघांकडे देणगी मागण्याचे पत्रही आढळले. मुलांना पळवून नेण्याचा किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले नाही. गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही दोघांना संशयित समजून गर्दी केली. घटनेचे व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर टाकण्यात आले. मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मण हजारे आणि प्रकाश चासकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *