![]()
पुण्यात केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या विश्रांती हॉस्पिटलने कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘दिवाळी विथ अ पर्पज’ उपक्रम घेतला. या कार्यक्रमात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणेचे संचालक आणि कमांडंट सर्जन व्हाइस अॅडमिरल मनीष होनवाड (विशिष्ट सेवा पदक) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कर्करोगाचा परिणाम रुग्णासोबतच संपूर्ण कुटुंबावर होतो. रुग्णांना शारीरिक वेदनांसह मानसिक आणि आर्थिक संकटांचाही सामना करावा लागतो, असे होनवाड म्हणाले. विश्रांती हॉस्पिटल मोफत उपचारांसोबत मानसिक आधार आणि आत्मविश्वास देण्याचे काम करते. हे हॉस्पिटल कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पुण्याचे कमांडंट मेजर जनरल सनिल मोहन, निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे, निवृत्त कर्नल एन. एस. न्यायापती आणि डॉ. वत्सला स्वामी उपस्थित होते. होनवाड म्हणाले, कर्करोगाच्या उपचारांदरम्यान डॉक्टर आणि कुटुंबीयांचा आधार रुग्णासाठी महत्त्वाचा असतो. औषधोपचारांइतकाच मानसिक आधारही गरजेचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळे रुग्णाला या प्रवासात खंबीर राहण्याची आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची ताकद मिळते. निवृत्त लेफ्टनंट जनरल एम. ए. टूटकणे म्हणाले, विश्रांती हॉस्पिटल कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदतीसोबत मानसिक आणि शारीरिक आधार देते. रुग्णांसाठी हे हॉस्पिटल उपचारांच्या ठिकाणापलीकडे जाऊन माहेरघरासारखे झाले आहे. कमांड हॉस्पिटलचे कमांडंट मेजर जनरल सनिल मोहन यांनी सांगितले, विश्रांती हॉस्पिटल रुग्णांच्या वेदना आणि भावना समजून घेऊन त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्यास मदत करते. रुग्णासोबत त्याच्या कुटुंबालाही मानसिक बळ मिळते. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आरोग्य संस्थांची समाजाला गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमात कर्करोगाशी लढा देत असलेल्या ग्लेंडा रॉजर, जस्मिन शेख, लता कांबळे, जुलेखा खान, शारदा जाधव, राजेश सहजवाला, ज्योती ठाकूर, शीतल बक्शी आणि संतोष दीक्षित यांच्यासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अनुभव सांगितले. विश्रांती हॉस्पिटलमधील उपचार, डॉक्टरांचे सहकार्य आणि मिळालेला आधार याबद्दल त्यांनी सांगितले.
Source link
विश्रांती हॉस्पिटलने कर्करुग्णांसाठी दिवाळी उपक्रम घेतला:‘दिवाळी विथ अ पर्पज’मध्ये रुग्ण आणि कुटुंबीयांना भावनिक आधार; अॅडमिरल मनीष होनवाड यांचे गौरवोद्गार