![]()
लोकशाहीची मूल्ये जपणे, अराजकतेच्या प्रवृत्तींना ठामपणे प्रत्युत्तर देणे आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी शनिवारी ता. १४ येथे केले. हिंगोलीत भाजपाच्या वतीने आयोजित ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या पदयात्रेचा सामारोप महात्मा गांधी चौक येथे झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा प्रभारी संजय कौडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, खासदार रामराव वडकुते, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, शशिकांत वडकुते, मिलिंद यंबल यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुनील राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि भूमिकेवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून देशात अराजकता पसरवण्याचे आणि दिशाभूल करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य दिले असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली आहे. अशा विघातक आणि अराजक प्रवृत्तींना जनता आता थारा देणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचा विकास, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, जनकल्याणकारी योजना आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा या सर्वच क्षेत्रांत ऐतिहासिक प्रगती साधली आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ करत विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंगोली शहरातून पदयात्रा हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून पदयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या पदयात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.
Source link
अराजकतेच्या प्रवृत्तीला ठामपणे प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज:भाजप प्रदेश सरचिटणीस सुनील राणेंचे विधान