![]()
नागपुरातील मेडिकल चौकात गुरुवारी, १२ नोव्हेंबरच्या रात्री पलाश उर्फ गनी प्रकाश वासनिक (३२) याची हत्या झाली. धारदार शस्त्राने वार केल्यानंतर हल्लेखोरांनी सिमेंटच्या कुंडीने त्याचे डोके ठेचले. या प्रकरणात पलाशचा मेहुणा चिंटू उर्फ आयुष धुपे आणि त्याच्या साथीदारावर संशय आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास मेडिकल रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पलाश असताना संशयितांनी त्याला गाठले. आधी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी पलाशवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. पलाश खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी जवळची सिमेंटची कुंडी उचलून त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारली. गंभीर जखमी झालेल्या पलाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर संशयित पळून गेले. या घटनेचा वाहतुकीवरही परिणाम झाला. पलाशचे पत्नीशी वारंवार वाद होत होते. तो पत्नीला मारहाण करून त्रास देत असल्याने तिचा भाऊ आयुष नाराज होता, अशी माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्रीही पती-पत्नीत वाद झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर आयुषने साथीदाराच्या मदतीने हल्ला केल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी हत्येमागचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट केलेले नाही. पलाश पोलिसांच्या नोंदीतील हिस्ट्रीशीटर होता. त्याच्यावर लुटमार, खंडणी आणि मारहाणीसह विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे वृत्त आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झाली होती. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. २०२२ मध्ये सावनेर परिसरात एका तरुणीच्या विवाहास नकार दिल्याच्या रागातून तिच्या वडिलांचे दुकान आणि वाहन पेटवल्याच्या प्रकरणातही पलाशला अटक झाली होती. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी पोहोचली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. संशयितांचा शोध सुरू असून, हत्येत आणखी किती जण सहभागी होते याचाही तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही चित्रण तपासायला घेतले आहे.
Source link
नागपुरात गुंडाची हत्या; मेहुण्यावर संशय:मेडिकल चौकात धारदार शस्त्राने वार करून सिमेंटच्या कुंडीने डोके ठेचले