![]()
सेनगाव तालुक्यातील लिंगा शिवारात पूर्णा नदीपात्राच्या काठावर नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंदाजे 6 ते 7 वर्षे वयाच्या या बिबट्याचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचा ताबा घेतला. रविवारी (ता. 9 नोव्हेंबर) शासकीय नियमानुसार शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून बिबट्याचे शरीर जाळून नष्ट करण्यात आले. सेनगाव तालुक्यातील लिंगा शिवारात शनिवारी (ता. 8 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. परिसरातील काही ग्रामस्थ गुरे चारण्यासाठी पूर्णा नदीपात्राच्या काठावर गेले होते. यावेळी त्यांना नदीकाठच्या परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसून आला. सुरुवातीला बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि चर्चेला सुरुवात झाली. नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. अंधार असूनही वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आवश्यक पंचनामा आणि इतर प्रशासकीय नोंदी पूर्ण केल्यानंतर मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर शासकीय वाहनातून मृतदेह सेनगाव येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नष्ट रविवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून बिबट्याचे शासकीय नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले. या तपासणीदरम्यान बिबट्याचा मृत्यू एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणीतील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिबट्याचे संपूर्ण शरीर आणि नैसर्गिक अवयव नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आले. वन्यप्राण्यांच्या मृत्यूनंतर संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही संपूर्ण कार्यवाही विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. माने, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. केंद्रे, मानद वन्यजीवरक्षक डॉ. श्रीधर कंदी, पशुवैद्यकीय अधिकारी एस. बी. देवकर, एस. एस. पठाडे, एस. एम. बुखारी यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी डी. ए. कापसे, लिंगदरीच्या पोलीस पाटील रविता राठोड आणि ग्रामसेवक भगवान जाधव उपस्थित होते. तसेच वनपाल पी. टी. केंदळे, वनरक्षक एस. ए. ढगे, जी. आर. घुगे, एस. सी. तनपुरे, विलास चाटसे, व्ही. आर. मुदीराज, महादू शिंदे, बबन राठोड यांच्यासह सतीश कापसे, भुजंगराव शिरामे, नामदेव नाईकल, हनुमान झाडे, सुनील राठोड, विठ्ठल राठोड, विनायक राऊत आणि संग्राम भालेराव आदी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, पूर्णा नदीपात्राच्या काठावर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बिबट्याचा मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी त्यामागील नेमके कारण वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट होणार आहे. हेही वाचा…. अमृता फडणवीसांनी भाऊबिजेला बोलावलं नाही, तरी ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार:मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य चर्चेत
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्याला भाऊबीजेसाठी घरी बोलावले नसले, तरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भाऊबीज पाठवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा पवार आणि अमृता फडणवीस यांनाही भाऊबीज पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आरक्षण, मराठा समाजाची एकजूट, लाडक्या बहिणींची दिवाळी आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सविस्तर वाचा….
Source link
सेनगावजवळ पूर्णा नदीपात्राच्या काठावर नर बिबट्या मृतावस्थेत:संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज