![]()
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अजून लोकांच्या मनात रुजलेले नाहीत, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केली. महापुरुषांचे पुतळे उभारणाऱ्यांचेही त्यांनी कान टोचले. विचार मनात रुजले, तर पुतळे उभारण्याची किंवा जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. रमणबाग युवा मंच आणि ‘गोष्ट इथे संपत नाही’ संस्थेचे सारंग भोईरकर व सारंग मांडके यांनी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे ‘समरभूमी- किल्ले पन्हाळगड’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पन्हाळगडाची प्रतिकृती आणि साउंड अँड लाइट शोचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. प्र. के. घाणेकर, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज नरेश प्रधान, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद कांबळे, रमणबाग प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुनील शिवले, रमणबाग युवा मंचचे अध्यक्ष शांतीसागर निपुणगे, सारंग भोईरकर आणि सारंग मांडके उपस्थित होते. इंग्लंडसह परदेशातील अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे दिसत नाहीत, कारण तिथल्या लोकांच्या मनात त्यांचे विचार रुजलेले असतात, असे राज ठाकरे म्हणाले. आपल्याकडे शिवाजी महाराजांवरील प्रेम दाखवण्यासाठी पुतळा उभारणे हाच पर्याय अनेकांना दिसतो, असेही त्यांनी सांगितले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि दिवंगत इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची आठवण काढत ठाकरे म्हणाले की, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर इतिहासाकडे कसे पाहावे, हे समजले. किल्ल्यांवर माहिती देणाऱ्या गाइडना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. परदेशात सरकार गाइड कोण असावेत हे ठरवते; आपल्याकडे मात्र कोणीही गाइड होतो. त्यामुळे चुकीचा इतिहास पसरतो आणि अनेक दंतकथा तयार होतात, असे ठाकरे म्हणाले. दंतकथा रंजक असल्याने त्या अधिक प्रचलित होतात, असे सांगताना त्यांनी एक उदाहरणही दिले. इतिहासातून वर्तमानात काय करायचे, हे शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे निवेदन सुजीत सोमण यांनी केले. सारंग मांडके यांनी आभार मानले.
Source link
राज ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांचे विचार अजून मनात रुजले नाहीत:पुतळे उभारण्यावरून टोचले कान; किल्ल्यांवरील गाइडना प्रशिक्षण देण्याची गरजही सांगितली