Headlines

हेळगावमध्ये रस्त्याच्या अवघ्या अडीच फुटांच्या जागेवरून दोन कुटुंबांत रक्तरंजित वाद:कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोच्याने हल्ला, तरुणाचा मृत्यू, 13 जणांवर खुनासह गंभीर गुन्हे दाखल




घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी अवघ्या अडीच फुटांच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाचे रविवारी सकाळी रक्तरंजित हाणामारीत रूपांतर झाले. कराड तालुक्यातील हेळगाव येथे दोन कुटुंबांमध्ये कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत सूरज भरत सूर्यवंशी (वय 28) या तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारींवरून 13 जणांवर खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्षभरापासून रस्त्याच्या जागेवरून वाद हेळगावमधील सूर्यवंशी कुटुंबातील दोन गटांमध्ये घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीवरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. रस्त्यासाठी नेमकी किती जागा असावी, यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात हा वाद अधिक चिघळला. रविवारी सकाळी प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर दोन्ही गट आमनेसामने आले. सुरुवातीला झालेल्या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी शस्त्रांचा वापर केल्याने परिस्थिती गंभीर बनली. कुऱ्हाड, कोयता आणि लोखंडी टोच्याने हल्ला पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, या हाणामारीत कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला. हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. याच घटनेत सूरज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. सूरज हा विकास सोसायटीत सचिव म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूमुळे हेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी या प्रकरणात दोन्ही गटांकडून पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका बाजूने दहा जणांविरोधात तक्रार दिली असून दुसऱ्या बाजूनेही सात जणांविरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीमंत उर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन उर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन उर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी यांच्यासह रेश्मा, सुनिता, तेजस्विनी, शालन आणि विद्या सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत श्रीमंत उर्फ उत्तम सूर्यवंशी याने कुऱ्हाडीने, आयुष सूर्यवंशी याने लोखंडी टोच्याने, तर ओंकार सूर्यवंशी याने कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सचिन आणि रामचंद्र सूर्यवंशी यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतर संशयितांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. अनेक जण जखमी या हाणामारीत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी आणि रोहिणी भरत सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका व्यक्तीवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुणही आरोपी या घटनेतील काही तरुण शिक्षित असून काही जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही तरुण पुण्यात नोकरी करत असल्याचे, तर काही जण बँकिंग क्षेत्रात कार्यरत असल्याचेही सांगितले जात आहे. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांचाही या वादात सहभाग असल्याने या घटनेची चर्चा होत आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित तरुणांच्या पुढील शिक्षण, नोकरी आणि सरकारी सेवेसाठीच्या प्रक्रियेवर काय परिणाम होईल, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम परिणाम न्यायालयीन प्रक्रिया आणि संबंधित भरतीच्या नियमांनुसारच ठरेल. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीवायएसपी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे. सध्या हेळगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात या प्रकरणाचा तपास करत आहेत. रस्त्याच्या अवघ्या काही फुटांच्या जागेवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर दोन्ही कुटुंबांतील अनेक जण कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. रस्त्याच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद हिंसाचारापर्यंत पोहोचल्याने गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेबाबत तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. हेही वाचा.. ‘दीपकेंसोबत का जाऊ?’ प्रकाश आंबेडकरांचा सवाल:1 तारखेला इराणच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके एकत्र येणार असल्याच्या राजकीय चर्चांना आता खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच पूर्णविराम दिला आहे. अभिजीत दीपके यांनी अद्याप औपचारिकपणे राजकारणात प्रवेश केलेला नसताना त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली. ‘ज्यांनी अजून राजकीय भूमिका स्वीकारली नाही, त्यांच्यासोबत का जाऊ?’ असा सवाल त्यांनी केला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *