![]()
पुणे आणि परिसरात यंदाच्या गणेशोत्सवात 100 गणेश मंडळांनी व्यसनमुक्तीची मोहीम राबवली आहे. ‘संयम ठेवा, नशेला दूर करा, यशाच्या वाटेवर पुढे चला’ आणि ‘स्क्रीनमध्ये हरवू नका, खऱ्या जगापासून दुरावू नका’ असे संदेश देणारे फलक मंडळांनी उत्सव मंडपात आणि आजूबाजूला लावले आहेत. हा अनोखा उपक्रम जय गणेश व्यासपीठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या सहकार्याने राबवण्यात आला. नंदकुमार राठी, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते आणि पियुष शहा यांनी यात पुढाकार घेतला. अमली पदार्थांच्या व्यसनासोबतच मोबाईल आणि स्क्रीनचा वापरही वाढला आहे. याबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात देशभरातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी उपनगरांतील मंडळांनीही यात सहभाग घेतला. श्री कसबा गणपती मंडळ, सुवर्णयुग तरुण मंडळ, शनी मारुती बाल गणेश मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, संयुक्त प्रसाद मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ, शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ, एकता मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, साखळीपीर तालीम मंडळ आणि नवज्योत मित्र मंडळ येरवडा यांसारख्या अनेक मंडळांनी जनजागृतीपर फलक लावले आहेत. अनेक मंडळांनी यंदा पारंपरिक प्रबोधनपर आणि सजीव देखावे साकारले आहेत. त्यासोबतच उत्सव मंडपाच्या दर्शनी भागात जनजागृती करणारे फलकही लावले आहेत. पुणे शहरातील सर्व पेठा, कॅम्प, येरवडा, हडपसर, कर्वे रस्ता, भांडारकर रस्ता, कात्रज, सहकारनगर, सिंहगड रस्ता आणि कोंढवा यांसारख्या विविध भागांतील मंडळांनी या मोहिमेत भाग घेतला.
Source link
गणेशोत्सवात 100 मंडळांनी व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवली:जय गणेश व्यासपीठ, दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व ताराचंद रामनाथ ट्रस्टच्या सहकार्याने उपक्रम