Headlines

मांजरखेड रस्त्यावरील पूल खचला:जड वाहतुकीमुळे रस्ता बंद; ग्रामस्थांनी बॅरिकेड्स लावून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली




चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे जाणाऱ्या मांजरखेड रस्त्यावरील पूल खचला आहे. यामुळे वाहतूक थांबली असून भाविकांना अडचणी येत आहेत. संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांच्या शेताजवळ हा पूल अचानक खचल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या भागात मोठा पाऊस किंवा दुसरी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नव्हती. तरीही पूल खचल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. या मार्गावरील जड वाहतूक आणि पुलाची खराब स्थिती यामुळे ही घटना घडली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. पुलाच्या खचण्याचे नेमके कारण प्रशासनाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. पूल खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे लोकांना सांगण्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांनी या मार्गावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर प्रवास करणे धोकादायक ठरू शकते, असे संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण राठोड यांनी सांगितले. भाविक आणि प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने, खचलेल्या पुलाच्या मार्गाने प्रवास न करता प्रशासनाने तातडीने उपाय करावेत, अशी मागणी पुढे आली आहे. पोलीस पाटील हिरासिंग राठोड, विश्वस्त गोविंद राठोड, लक्ष्मण राठोड, ग्रामस्थ आशिष कुकडकर, गजानन मंगळे, किशोर राठोड, शरद पाटील, कल्पेश मंगळे, दुर्गेश राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्याचे काम केले आहे. सावंगा विठोबा संस्थानने रस्ता आणि पुलाच्या दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली होती. मात्र, वेळेत लक्ष न दिल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी केला आहे. ग्रामस्थांकडूनही प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. पूल खचल्यामुळे श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चांदूर रेल्वे–मांजरखेड मार्गाचा वापर सध्या टाळावा, असे आवाहन श्री विठोबा संस्थानने केले आहे. भाविकांनी सावंगा विठोबा येथे येण्यासाठी मालखेड, हातला किंवा चिरोडी फाट्यावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे संस्थानने सांगितले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *