Headlines

प्रेमाचा भयानक अंत!:क्षुल्लक वादातून 70 वर्षीय वृद्धेकडून प्रियकराचा खून; डीएनए रिपोर्टमुळे दीड महिन्यांनंतर थरारक खुलासा




पंढरपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वय वर्षे 70 असलेल्या एका वृद्ध महिलेने किरकोळ वादातून आपल्याच प्रियकराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह जाळून टाकला होता. मात्र, घटनेनंतर तब्बल 1.5 महिन्यांनी आलेल्या डीएनए (DNA) रिपोर्टमुळे या गुन्ह्याचा थरारक उलगडा झाला असून पंढरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपी वृद्धेला बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंध अन् शेतात पेटवला वाद अंबादास खांडेकर (वय 70) असे मृत वृद्धाचे नाव असून, मंगल होनमाने असे गुन्हा करणाऱ्या आरोपी वृद्धेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. 27 जुलै रोजी दोघांमध्ये एका विषयावरून जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि रागाच्या भरात मंगलने अंबादास यांची शेतातच हत्या केली. पाप लपवण्यासाठी तिने अंबादास यांचा मृतदेह तिथेच जाळून टाकला आणि घटनास्थळावरून पळ काढला. अर्धवट जळालेला मृतदेह अन् पोलिसांचे आव्हान घटनेनंतर काही दिवसांनी, म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी स्थानिक गावकऱ्यांना शेतात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलावून नमुने जप्त केले आणि मृतदेह ‘डीएनए’ चाचणीसाठी पाठवला. डीएनए रिपोर्ट जुळला अन् तपासाला गती मिळाली तपासादरम्यान अंबादास खांडेकर नावाचे वृद्ध बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयावरून पोलिसांनी त्यांच्या 2 मुलींचे डीएनए नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. नुकताच या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये मृतदेहाचे नमुने अंबादास यांच्या मुलींशी तंतोतंत जुळले. यामुळे मृतदेह अंबादास यांचाच असल्याचे निश्चित झाले. अवघ्या 12 तासांत आरोपी महिला जाळ्यात मृतदेहाची ओळख पटताच पंढरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत मंगल होनमाने हिला ताब्यात घेतले. पोलिसी कचाट्यात सापडताच तिने आपला गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंधांमधील भांडणाचा राग सहन न झाल्यानेच आपण अंबादास यांचा काटा काढल्याचे तिने कबूल केले. या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. 70 वर्षांच्या वयात घडलेल्या या प्रेमाच्या हिंसक अंताने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *