![]()
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी भारत विकास परिषद दक्षिण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखेने ‘स्व-आधार’ उपक्रमांतर्गत मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चाकण येथील एसकेएस फास्टनर्स लिमिटेड (युनिट-४), गट क्रमांक ८ व ९, वराळे, ता. खेड येथे होणार आहे. या शिबिरात पाय किंवा हात गमावलेल्या दिव्यांग व्यक्तींचे मूल्यमापन करून कृत्रिम अवयवांसाठी मोजमाप घेतले जाईल. पात्र लाभार्थ्यांना अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय, कृत्रिम हात तसेच गरजेनुसार पोलिओ कॅलिपर आणि एंकल फूट ऑर्थोसिससारखी उपकरणे मोफत दिली जातील. मोजमापानंतर सुमारे चार ते पाच आठवड्यांनी एका प्रदान शिबिरात कृत्रिम अवयवांचे मोफत प्रत्यारोपण केले जाईल. त्यानंतर दुरुस्तीची सुविधाही मोफत उपलब्ध असेल. ‘स्व-आधार’ उपक्रमांतर्गत २०२५-२६ या काळात विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमधून ६०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, तळेगाव दाभाडे, यवत, कोंढणपूर, बारामती आणि सातारा तसेच बेळगावी, मुझफ्फरपूर व गुवाहाटी येथेही अशी शिबिरे झाली आहेत. या सेवेसाठी जात, धर्म, वय किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता गरजू दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या एका सोबतीसाठी भोजन तसेच मुख्य रस्त्यावरील बसस्थानकापासून वाहनाची सोयही उपलब्ध आहे. नोंदणीसाठी राजेंद्र पाध्ये (९५५२६१८९००) किंवा फणिंद्र खानापूरकर (९९२२९९१८५०) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच bvpsouthpune@gmail.com या ई-मेलवरही संपर्क करता येईल, अशी माहिती शशिकांत पदमवार आणि जयंत जेस्ते यांनी दिली. पत्रकार परिषदेला रवींद्र आठवले, विभावरी खानापूरकर आणि माधव आफळे उपस्थित होते.
Source link
चाकणमध्ये दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिर:4 ऑक्टोबरला आयोजन; पात्र लाभार्थ्यांना अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय व हात मोफत