Headlines

टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन आरोपी अटकेत:एक बिहारमधून तर दुसऱ्याला बीडमधून पकडले, पेपरफुटीची साखळी उघड होणार?




महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रकाश मिसाळ आणि अशोक कुमार साव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील प्रकाश मिसाळ याला बीड जिल्ह्यातून, तर अशोक कुमार साव याला बिहारमधून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी 15 पुरुष आणि एका महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. आता आणखी दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने टीईटी पेपरफुटी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 18 वर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना पेपर वाचून दाखवण्याची प्रकाश मिसाळची भूमिका पोलिसांच्या तपासानुसार, बीड जिल्ह्यातील प्रकाश मिसाळ हा टीईटीचा पेपर मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांना तो वाचून दाखवण्याच्या तयारीत होता. पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील इतर व्यक्ती आणि विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशोक कुमार साव कोणाच्या संपर्कात होता? दुसरा आरोपी अशोक कुमार साव याला बिहारमधून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, साव हा या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून तपासात समोर आलेल्या बीजेंदर कुमार गुप्ता याच्या संपर्कात होता. त्याच्याकडून टीईटीचा पेपर मिळवून तो पुढे पेपरफुटीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या एजंटला विकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी 3,500 पानी आरोपपत्र दाखल टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात तब्बल 3,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, फरार असलेल्या दोन आरोपींपैकी दोघांनाही आता अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने अटक केलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, त्यांच्या माध्यमातून पेपरफुटीच्या साखळीतील आणखी काही व्यक्ती किंवा व्यवहारांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 28 जूनची टीईटी परीक्षा झाली होती रद्द महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 28 जून रोजी राज्यभरातील 1,028 केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षेला तीन महिन्यांच्या आसपासचा कालावधी उलटत आला असला तरी अद्याप नव्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे टीईटीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष आता परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाकडे लागले आहे. पेपरफुटीच्या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते आणि परीक्षा कधी घेतली जाणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. हेही वाचा… IIT मुंबई आत्महत्या प्रकरण:जातीयवादी अपशब्द वापरत तीन महिने मानसिक छळ केल्याचा साहिलच्या वडिलांचा आरोप, प्राध्यापकाविरोधात FIR दाखल आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डल्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *