Headlines

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने फाडला खाकीचा बुरखा:पदकविजेत्या पोलिसाच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या; 3 वर्षांनंतर गुन्हा दाखल




खाकी वर्दीतील पदकविजेत्या पोलीस कर्मचाऱ्याने 18 वर्षीय तरुणीकडे अश्लील मेसेज पाठवून शरीरसुखाची मागणी केली आणि त्या मानसिक त्रासातूनच तरुणीने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (FSL) तरुणीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला संपूर्ण डेटा रिकव्हर केल्यानंतर या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. या अहवालाच्या आधारे गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलिसांनी नक्षल गोपनीय शाखेतील पदकप्राप्त पोलीस अंमलदार आणि तरुणीच्या प्रियकराविरोधात अखेर आत्महत्येस प्रवृत्त करणे व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. नेमकी काय आहे घटना? 9 नोव्हेंबर 2023 रोजी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. गंभीररीत्या होरपळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून तिला प्रवृत्त केले गेले असल्याचा संशय व्यक्त करत सातत्याने सखोल तपासाची आणि कारवाईची मागणी लावून धरली होती. तरुणीच्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती डिलीट करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर, तो मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक गौप्यस्फोट प्रयोगशाळेतून मोबाईलचा डिलीट केलेला डेटा पूर्ववत करण्यात आला, तेव्हा समोर आलेल्या व्हॉट्सॲप चॅट्स आणि फोटोंनी पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली. मृत तरुणीचे चिपोटा (ता. देवरी) येथील विकेश अंबादे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, तत्कालीन देवरी नक्षल गोपनीय शाखेत कार्यरत असलेला पोलीस अंमलदार ओमप्रकाश जामनिक (वय ४४, सध्या रा. अकोला) याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शिरकाव केला. अश्लील फोटो व शरीरसुखाची मागणी उत्कृष्ट सेवेसाठी पदक पटकावणाऱ्या या पोलीस अंमलदाराने अधिकाराचा व पदाचा गैरवापर करत तरुणीला स्वतःचे अत्यंत अश्लील छायाचित्रे पाठवली होती आणि तिच्याकडे शरीरसुखाची थेट मागणी करणारे मेसेज पाठवले होते. पोलिसाच्या या घाणेरड्या मेसेजमुळे तरुणी आणि तिच्या प्रियकर विकेशमध्ये वारंवार तीव्र वाद होऊ लागले. एका बाजूला पोलिसाकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ आणि दुसऱ्या बाजूला प्रियकराचा संशय व वाद, या दुहेरी विळख्यात सापडल्याने हताश झालेल्या या तरुणीने अखेर स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. दोन आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हा न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पुराव्यांची तपासणी करून २९ नोव्हेंबर २०२३ रोजी शासकीय अभियोक्त्यांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला होता. त्यानंतर तपासाला गती देत सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या तक्रारीवरून चिचगड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. प्रियकर विकेश अंबादेवर बीएनएस कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ५०४ (शांतताभंग करण्याच्या हेतूने अपमान करणे) आणि ५०६ (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर पदकप्राप्त पोलिस ओमप्रकाश जामनिकवर कलम ३५४ (अ) (लैंगिक छळवणूक/शरीरसुखाची मागणी करणे) आणि कलम ५०९ (स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचवणे) अंतर्गत गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. अटकेची कारवाई अद्याप प्रलंबित; संतापाची लाट पुरावे समोर येऊन एफआयआरमध्ये कलमे वाढवली असली, तरी अद्याप आरोपी पोलीस अंमलदाराला आणि प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नाहीत. स्वतःच्या खात्यातील पदकप्राप्त अंमलदाराचे काळे कारनामे चव्हाट्यावर आल्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलात मोठी नामुष्की ओढवली असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची आग्रही मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *