![]()
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कर्ज आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कासारी गावात राहणाऱ्या सुभाष भानुदास माळी या 55 वर्षीय शेतकऱ्याने शेतात रोगर हे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष माळी हे अत्यंत अल्पभूधारक आणि कष्टकरी शेतकरी होते. त्यांच्याकडे केवळ पावणेदोन एकर (72 गुंठे) शेतजमीन होती. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे आणि भयानक दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी शेतात पेरलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून गेले होते. एकीकडे हातातून गेलेले पीक आणि दुसरीकडे डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे, यामुळे ते प्रचंड नैराश्यात गेले होते. याच चिंतेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. कर्जाचा डोंगर आणि उपचाराचा खर्च मृत शेतकऱ्याचा मुलगा अमित माळी याने वडिलांच्या आत्महत्येमागची विदारक परिस्थिती मांडली. त्यांच्यावर बँकेचे तसेच मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले खाजगी कर्ज होते. पीक हाती न आल्याने हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. विष प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते, जिथे एका लाखाचे बिल झाले. पैशांची सोय नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. कर्जाच्या याच असह्य ताणामुळे त्यांनी आपला जीव दिला. ग्रामस्थांची हळहळ या दुर्दैवी घटनेवर कासारी गावातील ग्रामस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सुभाष माळी हे अतिशय गरीब आणि प्रामाणिक शेतकरी होते, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदाही सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाकडून कोणतीही वेळेवर मदत न मिळाल्यामुळे ते पूर्णपणे हताश झाले होते. डोळ्यांसमोर पीक जळून जाताना पाहिल्याने त्यांचा धीर खचला आणि हतबलतेतून त्यांनी हे भयानक पाऊल उचलले. शासनाकडे मदतीची आर्त हाक सुभाष माळी यांच्या पश्चात आता त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि एक उच्चशिक्षित मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे शासनाने या कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे. तसेच, त्यांच्या शिक्षित मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे आणि स्थानिक आमदार, खासदार व पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून कुटुंबाला जगण्याचा आधार द्यावा, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Source link
सोलापुरात दुष्काळाचा बळी!:कर्ज आणि नापिकीला कंटाळून बार्शीत शेतकऱ्याची आत्महत्या, विष प्राशन करत उचलले टोकाचे पाऊल