Headlines

'लाईट कॅमेरा ॲक्शन…':तुमच्याच पक्षाचा कोणीतरी येईल आणि तुमच्यात बगलेत जाऊन रडेल, सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका




शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात सातत्याने सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी गोरेंना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. यापूर्वी जयकुमार गोरे यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गोरेंवर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची यादीच मांडली होती. आता पुन्हा आक्रमक होत, “एखाद्या केसने लोक गप्प बसतील असे होत नाही, आता थेट तुमच्या मतदारसंघातच भेटूया,” असा स्पष्ट इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे. याशिवाय, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरूनही जोरदार टीका करत आपला निषेध नोंदवला आहे. सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एखादी केस दाखल केली म्हणजे लोक गप्प बसतील, या भ्रमात गोरे यांनी राहू नये. अशा गोष्टींना जर घाबरणाऱ्यांपैकी मी असते ना, तर केव्हाच सत्ताधाऱ्यांच्या रेड कार्पेटवरून चालण्याची तयारी दाखवली असती. पण, मी संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. मी सोलापूरमध्ये आहे आणि पक्षप्रमुखांनी माझी इथली बांधणी बघून, आता तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आला आहात ना, त्याही मतदारसंघात मला काम करायला पाठवलं आहे. त्यामुळे, आता आपण पुन्हा पुन्हा भेटूया, असे आव्हान अंधारे यांनी गोरे यांना दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुष्काळ पाहणी केली, त्यांना शेतातील फार काही कळत नाही. विरोधी बाकावर असताना त्यांची भूमिका वेगळी होती, आता त्यांची भूमिका बादळलील आहे. कदाचित उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने मुहूर्त असेल पण इतके ही थांबायची गरज काय? असा सवाल करत जीआर काढण्यास शासन उशीर करत असल्याची टीका अंधारे यांनी केली आहे. लाईट कॅमेरा ऍक्शन… पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, स्पष्ट आहे की दुष्काळ पडलाय, कापसावर लाल्या रोग पडलाय. दहा मिनिटात दौरा होत नसतो. तुमच्या बाजूला असलेला गोडबोल्या जयकुमार गोरेने हे तुम्हाला सांगायला हवे होते, तुमच्याच पक्षाचा कोणीतरी येईल, तुमच्यात बगलेत जाऊन रडण्याचे नाटक करेल, लाईट कॅमेरा ऍक्शन असे होत नसते. आदित्य ठाकरे करणार सोलापूर दौरा सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना सुषमा अंधारे यांनी बार्शीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर तीव्र दुःख व्यक्त करत, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहून आत्महत्येचा मार्ग टाळावा, अशी भावनिक साद आपल्या आईच्या कठीण संघर्षाचे उदाहरण देत घातली. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आज रात्री सोलापुरात मुक्कामी येणार असून, उद्या सकाळी साडेदहा वाजल्यापासून त्यांच्या दक्षिण सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या दोन दिवसीय दौऱ्याला सुरुवात होणार असल्याची माहितीही अंधारे यांनी यावेळी दिली. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर:लातूरच्या बांधावर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी दिला मदतीचा धीर राज्यात पावसाने दडी मारल्याने भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस कोसळला नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शेतकऱ्यांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे सर्वच मंत्री सध्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील फिल्डवर उतरले असून, त्यांनी आज लातूरमध्ये जाऊन शेतीच्या नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *