![]()
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नदीकिनारी असलेल्या विसर्जन घाटांवर, कृत्रिम हौदांवर, लोखंडी टाक्यांमध्ये, निर्माल्य कलश, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, अग्निशमन दल, जीवरक्षक, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या काळात महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास काम करेल. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जास्त प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्ही नियंत्रण आणि आपत्कालीन पथकांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. विसर्जनादरम्यान कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन स्थिती आल्यास प्रशासनाला लगेच कळवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाचे २२ अधिकारी, १५ फायरमन आणि १२० जीवरक्षक तैनात आहेत. अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमा, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा घाट, चिमा उद्यान येरवडा, दत्तवाडी घाट आणि वारजे स्मशानभूमी येथे २४ तास सुरक्षा व्यवस्था असेल. नदीपात्रात आडवे दोरखंड बांधले जातील. तसेच २८ लाइफ जॅकेट आणि १४ रिंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्रात न जाता महापालिकेने तयार केलेल्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक गरजेनुसार विसर्जनासाठी मदत करतील. विसर्जन मिरवणुकीदरम्यान आपत्कालीन स्थितीसाठी अलका टॉकीज चौकात अग्निशमन वाहन आणि तीन जवान तैनात असतील. विसर्जन घाट आणि कृत्रिम विसर्जन हौदांच्या परिसरात जास्त गर्दी होणार असल्याने, महापालिकेच्या विद्युत विभागाने सुमारे २७७ ठिकाणी ४,१३० फ्लडलाईट्स लावले आहेत. तसेच सुमारे ९४ ठिकाणी ३९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी पॉवर बॅकअपची व्यवस्था केली आहे. विद्युत कर्मचाऱ्यांची पथके दिवस-रात्र काम करतील. अलका टॉकीज चौक, एस.पी. कॉलेज चौक आणि शनिपार चौक येथे वॉचटॉवर उभारून प्रकाश व्यवस्था केली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास काम करेल. विविध विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा बसवली आहे. विद्युत, ड्रेनेज, आरोग्य, घनकचरा आणि पथ विभागाची स्थानिक पातळीवर स्वतंत्र पथके तयार केली आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे क्रमांक: ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००. अग्निशमन दलासाठी: १०१ / ०२०-२६४५१७०७. पोलिसांसाठी: १०० / ११२. रुग्णवाहिकेसाठी: १०८.
Source link
गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज:15 घाटांवर 120 जीवरक्षक, 4130 फ्लडलाईट्स अन् 390 CCTV कॅमेरे तैनात