![]()
गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला आज (शुक्रवारी) उत्साहात सुरुवात झाली. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी ९.३० वाजता मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील झाला. त्यानंतर मानाच्या अन्य गणपतींच्या मिरवणुका पुढे सरकल्या. ढोल-ताशांचा गजर, नगारावादन, सनई-चौघडा आणि आकर्षक रथांमुळे शहरातील वातावरण गणेशमय झाले होते. मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक चांदीच्या पालखीत बसला होता. नगारखाना, रमणबाग, कामायनी, परशुराम आणि रुद्र गर्जना ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मिरवणूक टिळक चौकाकडे पुढे निघाली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी ९.४५ वाजता जोगेश्वरी चौकातून मार्गस्थ झाला. चांदीच्या पालखीत गणराय विराजमान झाले होते. नगारा, ब्रास बँड, विघ्नहर्ता व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांसह कार्यकर्ते पारंपरिक वेशात सामील झाले. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती सकाळी १०.३० वाजता मंडईतील टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीत सामील झाला. ‘माता महाकाली’च्या आकर्षक फुलांच्या रथातून गणरायाचे आगमन झाले. नगारावादन, ब्रास बँड आणि विविध ढोल-ताशा पथकांनी वातावरण गाजवले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती यंदा ‘श्री विष्णू रथा’तून विसर्जन मिरवणुकीत सामील झाला. भव्य विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि विविध प्रतिकृतींनी सजलेला रथ आकर्षणाचे केंद्र ठरला. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती फुलांनी सजवलेल्या पारंपरिक पालखीत बसला होता. सनई-चौघडा, ढोल-ताशा पथकांसह महात्मा फुले यांनी लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचे स्वागत केल्याच्या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित जिवंत देखावा सादर केला. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सायंकाळी चार वाजता ‘श्री वक्रतुंड’ रथातून मिरवणुकीत सामील होणार आहे. तर अखिल मंडई गणपतीचा ३२ फुटी ‘कोणार्क सूर्य मंदिर’ रथ सायंकाळी सात वाजता मिरवणुकीत येणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचाही भव्य रथ मिरवणुकीचे आकर्षण असेल. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मार्गावर सकाळपासूनच गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. मिरवणुका वेळेत पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळे आणि पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
Source link
पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात:महात्मा फुले मंडईत टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मिरवणूक मार्गस्थ