![]()
स्वीडनच्या संसदेत नुकत्याच खासदार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील आपल्या कुटुंबीयांच्या राजकीय वक्तव्यांवरून अत्यंत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रात आमचा खासदार पराभूत झाला असला, तरी विखे कुटुंबातील मुलगी स्वीडनमध्ये खासदार झाली,” असा दावा करणाऱ्या माजी खासदार सुजय विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांनी थेट तोफ डागली. “मागील 10 ते 12 वर्षांत माझा काकांशी किंवा चुलत भावाशी साधा संपर्कही झालेला नाही. आमचे विचार आणि राजकारण पूर्णपणे वेगळे असून, त्यांनी वारंवार पक्ष बदलले आहेत; मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे माझ्या कष्टाच्या यशाचे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका,” अशा स्पष्ट शब्दांत नीला विखे पाटील यांनी विखे कुटुंबातील अंतर्गत कौटुंबिक आणि राजकीय दरी चव्हाट्यावर आणली आहे. नेमका वाद कशामुळे पेटला? सुजय विखेंच्या व्हिडिओने धक्का 41 वर्षीय नीला विखे पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत स्वीडनच्या 349 सदस्यीय संसदेत (Riksdag) स्टॉकहोम शहर मतदारसंघातून विजय संपादन केला. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विखे घराण्याचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. वृत्तसंस्था पीटीआयशी स्टॉकहोम येथून बोलताना नीला विखे पाटील म्हणाल्या, “मला कोणीतरी महाराष्ट्रातील एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये माझा चुलत भाऊ सुजय विखे पाटील जाहीरपणे सांगत आहे की, महाराष्ट्रात विखे कुटुंबाचा पराभव झाला असला तरी स्वीडनमध्ये विखेंचा खासदार झाला आहे. हे ऐकून मला अत्यंत धक्का बसला आणि आश्चर्य वाटले.” “गेल्या दशकभरात ज्यांच्याशी साधा संवादही झाला नाही, ते आता माझ्या विजयावर स्वार होऊन त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.” 12 वर्षांत साधा फोनही नाही; भारतात आले तरी कधी भेटले नाही आपल्या कौटुंबिक संबंधांविषयी थेट खुलासा करताना नीला म्हणाल्या, “मागील 10 ते 12 वर्षांपासून माझे काका राधाकृष्ण विखे पाटील किंवा चुलत भाऊ सुजय यांच्याशी कसलाही दूरान्वये संबंध राहिलेला नाही. मी नियमितपणे भारतात येत-जात असते; परंतु या वर्षांत आमची कधीही भेट झालेली नाही.” अभिनंदनाचा फोन आला, पण… “मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर काल काकांनी (राधाकृष्ण विखे) मला फोन करून अभिनंदन केले, ही चांगली गोष्ट आहे. पण तेवढ्यापुरतेच; त्यापलीकडे आमच्यात कोणतेही कौटुंबिक किंवा राजकीय संबंध नाहीत, हे मी ठामपणे सांगू इच्छिते.” त्यांनी सतत पक्ष बदलले, मी मात्र एकनिष्ठ!”; काकांच्या राजकारणावर बोट आपली राजकीय विचारसरणी आणि काकांच्या राजकीय प्रवासातील तफावत अधोरेखित करताना नीला यांनी विखेंच्या पक्षबदलावर थेट निशाणा साधला. “माझे राजकारण आणि त्यांचे राजकारण पूर्णपणे भिन्न आहे. मी स्वीडनमधील ‘ग्रीन पार्टी’शी (Green Party) एकनिष्ठ आहे आणि मी माझा पक्ष कधीही सोडणार नाही. दुसरीकडे, माझ्या काकांनी (राधाकृष्ण विखे पाटील) सातत्याने पक्ष बदलले आहेत. ते आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये गेले आहेत.” कोण आहेत नीला विखे पाटील? महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणे असलेल्या विखे पाटील कुटुंबातील नीला या दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या सुकन्या आहेत. त्यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असून त्यांनी गॉथनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस (Gothenburg School of Business) आणि स्पेनमधील युनिव्हर्सिटी डी कॉम्प्लुटेन्स येथून अर्थशास्त्र आणि कायद्यात एमबीए (MBA) केले आहे. पंतप्रधान कार्यालयात सल्लागार राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात (PMO) राजकीय सल्लागार म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. 13 सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांनी पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या ‘ग्रीन पार्टी’च्या तिकिटावर स्टॉकहोम शहरातून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, नीला विखे यांच्या या थेट आणि खळबळजनक विधानांमुळे महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या राजकारणात आणि विशेषतः विखे पाटील कुटुंबामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ——————————— हेही वाचा… दुष्काळाचा जीआर आजच निघण्याची शक्यता: माथाडी कामगारांसाठी वडाळ्यात 2850 घरांचा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठ्या आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा शासन निर्णय (जीआर) आजच काढला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच, कै. अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकऱ्यांसाठी बनवलेल्या माथाडी कायद्याचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
काका आणि चुलत भावाशी 12 वर्षांपासून संबंध नाही!:माझ्या यशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न नको; स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटलांचा सुजय विखेंवर पलटवार