Headlines

दुष्काळाचा जीआर आजच निघण्याची शक्यता:माथाडी कामगारांसाठी वडाळ्यात 2850 घरांचा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा




राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठ्या आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा शासन निर्णय (जीआर) आजच काढला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच, कै. अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकऱ्यांसाठी बनवलेल्या माथाडी कायद्याचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. दुष्काळाचा जीआर आजच निघणार राज्यातील दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य मांडले. “दुष्काळ अतिशय मोठा असून पिके मोठ्या प्रमाणावर करपून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काहीच येईल, अशी परिस्थिती उरलेली नाही. बहुतांश भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही त्याचे संपूर्ण नियोजन करत असून, दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यासाठी आजच यासंदर्भातला जीआर काढला जाईल, अशी शक्यता फडणवीस यांनी व्यक्त केली. माथाडी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई माथाडी कामगारांच्या सन्मानासाठी कै. अण्णासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन कायदा बनवला. मात्र, आज काही लोक या कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचे फडणवीस म्हणाले. “नरेंद्र पाटील आणि इतर सर्व कामगार नेत्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जे लोक या कायद्याचा गैरवापर करतात आणि कामगारांचे हित बाजूला ठेवून स्वतःचे घर भरतात, त्यांच्यावर आता सरकार कारवाई करणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. मात्र, खऱ्या माथाडी कामगारांना या कायद्याचे संरक्षण कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. माथाडी कामगारांना वडाळ्यात घरे आणि APMC चा पुनर्विकास माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. वडाळा या मोक्याच्या ठिकाणी माथाडी कामगारांसाठी जवळपास २,८५० घरे देण्याच्या प्रकल्पाची सुरुवात आजपासून झाली असून, याचा कामगारांना मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेत, आता ५० वर्षे जुने झालेले एपीएमसी (APMC) मार्केट रिडेव्हलप (पुनर्विकास) करण्याचा मोठा निर्णयही सरकारने घेतल्याची घोषणा त्यांनी केली. ‘एपीएमसीमध्ये पारदर्शक कारभारच चालेल’ एपीएमसी मार्केटमधील कथित घोटाळे आणि गैरकारभाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “येथे केवळ पारदर्शक कारभारच चालला पाहिजे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्याचे मंत्री जयकुमार रावल या संपूर्ण प्रक्रियेवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. जर कोणी अपारदर्शक कारभार केला, तर त्याच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. हेही वाचा.. निसर्गाचे विघ्न तूच दूर कर!:परिस्थिती अत्यंत भयानक, बाप्पा 7-8 दिवस तरी चांगला पाऊस पाडा – चंद्रकांत पाटलांचे विघ्नहर्त्याला साकडे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी थेट मेट्रोने प्रवास करत नागरिकांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी पुणेकरांना रात्री १२ च्या आत शिस्तबद्ध विसर्जन करण्याचे आवाहन केले. तसेच, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सध्याची स्थिती अतिशय ‘भयानक’ असल्याचे म्हटले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात असल्याने त्यांनी बाप्पाकडे पावसासाठी साकडे घातले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *