![]()
“निवडणूक आयोग आणि केंद्रीय तपास यंत्रणांना स्वतःचे गुलाम बनवून देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा राहुल गांधींनी केलेला ‘देशद्रोही’ हा उल्लेख 100 टक्के योग्य आहे. 2024च्या निवडणुकीतील गैरप्रकार आता उघड झाले असून 2029 मध्ये यांचा बाप जरी खाली उतरला, तरी त्यांना पुन्हा अशा गैरमार्गांचा वापर करता येणार नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर या सर्वांचे उर्वरित आयुष्य तुरुंगात आणि खटल्यांना तोंड देण्यातच जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अजूनही वेळ गेलेली नसताना माफीचे साक्षीदार व्हावे आणि निवडणूक हायजॅक करण्याचे आदेश कोणाचे होते ते देशासमोर उघड करावे,” असा खळबळजनक आणि घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवरील महाभियोग प्रस्ताव, तरुणांचे देशव्यापी आंदोलन, दुष्काळ आणि कर्जमाफीचा प्रश्न, तसेच गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर देशातील हुकूमशाहीच्या विसर्जनाची मागणी करत केंद्रातील मोदी-शाह सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ज्ञानेश कुमारांनी माफीचे साक्षीदार व्हावे; देशद्रोह्यांची जागा तुरुंगात निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांवरून मुख्य निवडणूक आयुक्तांना लक्ष्य करताना राऊत म्हणाले, “लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत राष्ट्रहिताची आणि धाडसी भूमिका मांडली आहे. या देशातील सर्वात मोठे गद्दार आज सत्तेवर बसले आहेत. त्यांच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निवडणूक हायजॅक केली, मते चोरली आणि लोकशाहीची हत्या केली. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले ते पूर्णपणे योग्य आहे.” “ज्ञानेश कुमारांना अजूनही एक संधी आहे. पंतप्रधान कार्यालय किंवा गृहमंत्रालयाकडून कोणाचे फोन येत होते? कोणाच्या सांगण्यावरून काय निर्णय घेतले गेले? याचे गौप्यस्फोट करत त्यांनी स्वतः माफीचे साक्षीदार व्हावे. अन्यथा सत्ता बदलल्यानंतर जनतेच्या रोषाला आणि गंभीर खटल्यांना सामोरे जावे लागेल.” 2029ला खटले आणि तुरुंगवास अटळ “2029 मध्ये देशात सत्ताबदल नक्की होणार आहे. ज्यांनी ज्यांनी घटनेशी आणि देशाशी बेईमानी केली आहे, मग ते पंतप्रधान असोत, गृहमंत्री असोत किंवा निवडणूक आयोग; त्या प्रत्येकावर खटले चालतील आणि त्यांचे पुढील आयुष्य तुरुंगातच जाईल. अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या जुन्या घोषणांचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “जनतेला रस्त्यावर मूर्ख बनवणाऱ्या आणि संविधानाचा गळा घोटणाऱ्या या गद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून योग्य ती अद्दल घडवेल.” संसदेला टाळे लावा; पुढच्या अधिवेशनात महाभियोग प्रस्ताव पुन्हा आणणार संसदेच्या कामकाजावरून केंद्र सरकारला घेरताना त्यांनी थेट आव्हान दिले. “ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी विरोधी पक्षांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६० खासदारांच्या स्वाक्षरीसह नोटीस दिली होती. परंतु राज्यसभेचे सभापती हे सत्ताधाऱ्यांचे ऐकणारे असल्याने त्यांनी तो प्रस्ताव नियमबाह्य पद्धतीने फेटाळला.” “येत्या अधिवेशनात विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला सोडणार नाही. महाभियोगाची प्रक्रिया पुन्हा राबवली जाईल. हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह विरोधी पक्षांच्या प्रश्नांना आणि जनरोषाला तोंड देण्याच्या भीतीने संसदेत पाऊल तरी ठेवतील का, अशी शंका आहे. जर देशाचे सर्वोच्च नेतेच भीतीने संसदेत येणार नसतील, तर संसदेला टाळे लावा आणि पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जा,” असा टोला त्यांनी लगावला. 48 तासांचा अल्टिमेटम; ‘जंतरमंतर 2’ देशभरात पेटणार अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या इशाऱ्यावर बोलताना राऊत म्हणाले, “हा आता औषध देऊन झोपवलेला भारत राहिलेला नाही, तर जंतरमंतरच्या आंदोलनानंतर देश खडबडून जागा झाला आहे. तरुण मुले आता भगतसिंगांप्रमाणे लढायला मैदानात उतरली आहेत.” झुरळांच्या फौजेला रोखणार “काँग्रेस अथवा उबाठाची लढाई संविधानासाठी आधीपासून सुरूच आहे; पण आता ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या गैरकृत्यांना रोखण्यासाठी तरुणांची ही नवी फौज रस्त्यावर उतरत आहे. ४८ तासांत राजीनामा न आल्यास जंतरमंतरपेक्षाही विशाल स्वरूपाचे देशव्यापी आंदोलन उसळेल. जंतरमंतरवरचे आंदोलन हे कोणत्याही पक्षाचा झेंडा नसलेले, देशातील सजग तरुणांचे आंदोलन होते. त्याला देशभरातील सर्व विरोधी पक्षांचे पूर्ण नैतिक आणि प्रत्यक्ष समर्थन होते आणि यापुढेही राहील.” इंदिरा गांधींच्या लोकशाही निष्ठेचा दाखला आणीबाणीच्या संदर्भावरून भाजपला आरसा दाखवताना राऊत म्हणाले, “भाजप नेहमी आणीबाणीचा उल्लेख करतो; परंतु इंदिरा गांधी या देशाच्या लोकशाहीच्या खऱ्या संरक्षक होत्या. त्यांनी स्वतः निवडणुका निष्पक्ष पद्धतीने घेतल्या. त्या स्वतः पराभूत झाल्या, संजय गांधी पराभूत झाले. त्या काळात त्यांनाही निवडणुका मॅनेज करता आल्या असत्या, पण भारताच्या जागतिक लोकशाही प्रतिमेला धक्का लागू नये ही त्यांची प्रामाणिक भावना होती. त्या पराभूत झाल्या, तुरुंगात गेल्या, चौकशी आयोगाला सामोरे गेल्या आणि पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्या. आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये पराभवाला सामोरे जाण्याची ती नैतिक ताकद उरलेली नाही.” दुष्काळ हा भाजपचा इव्हेंट नाही; तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा राज्यातील भीषण दुष्काळ आणि दुष्काळी उपाययोजनांवरून राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले. “सरकारने जुन्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्ष गावांमध्ये एकही खरा लाभार्थी शोधून सापडत नाहीये. ही कर्जमाफी केवळ कागदावरच राहिली की नेमकी कोणाच्या खिशात गेली, हे सरकारने स्पष्ट करावे.” “दुष्काळ निवारण हा काही सत्ताधाऱ्यांचा वैयक्तिक कार्यक्रम किंवा भाजपचा इव्हेंट नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रावरचे महाभयंकर संकट आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरित राज्यातील सर्व राजकीय पक्षांची आणि सर्व माजी मुख्यमंत्र्यांची ‘ऑल पार्टी मीटिंग’ बोलवावी. जुन्या मुख्यमंत्र्यांनी संकट कसे हाताळले याचे अनुभव समजून घेऊन एकदिलाने निर्णय घ्यावा.” बाप्पाच्या विसर्जनाबरोबर देशातील हुकूमशाहीचेही विसर्जन व्हावे गणेशोत्सवाच्या सांगतेवर बोलताना संजय राऊत भावुक आणि आक्रमक झाले. “गणपती म्हणजे अनेक गणांचा प्रमुख; ज्यातून आपल्या ‘गणराज्य’ या संघराज्य व्यवस्थेचा जन्म झाला. मात्र, आजच्या सत्ताधाऱ्यांनी या लोकशाही गणराज्याला हुकूमशाहीच्या विळख्यात ढकलले आहे.” “गणपती बाप्पाला निरोप देताना आम्ही हेच साकडे घातले आहे की, तुझ्या विसर्जनासोबतच देशावर लादल्या गेलेल्या या जुलमी हुकूमशाहीचे आणि भ्रष्ट व्यवस्थेचेही विसर्जन व्हावे. देशातून ही हुकूमशाही हद्दपार झाली, तर पुढच्या वर्षी गणरायाचे आणखी उत्साहात आणि वाजतगाजत स्वागत करू.” ——————— हेही वाचा… दुष्काळाचा जीआर आजच निघण्याची शक्यता: माथाडी कामगारांसाठी वडाळ्यात 2850 घरांचा प्रकल्प; देवेंद्र फडणवीसांच्या मोठ्या घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठ्या आणि दिलासादायक घोषणा केल्या आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा शासन निर्णय (जीआर) आजच काढला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच, कै. अण्णासाहेब पाटील यांनी कष्टकऱ्यांसाठी बनवलेल्या माथाडी कायद्याचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
बाप्पासोबत देशातील हुकूमशाहीचेही विसर्जन व्हावे!:संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले- पंतप्रधान-गृहमंत्री भीतीने संसदेत येणार नसतील तर संसदेला टाळे लावा!