![]()
भातकुली तालुक्यात प्रदीर्घ काळ पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामातील प्रमुख पिकांची स्थिती खालावली आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या कापणी व मळणीचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील काही शेतकरी सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर फिरवून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी जमीन तयार करीत असल्याचे क्षेत्रीय स्तरावर दिसून येत आहे. भातकुली तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनचे २२ हजार २०७ हेक्टर, कापसाचे १९ हजार १२८ हेक्टर, तुरीचे ९ हजार ३६१ हेक्टर क्षेत्र पेरणीखाली आहे. याशिवाय उडदाचे ७५ हेक्टर, इतर तेलबिया पिकांचे १० हेक्टर, मक्याचे ७.२० हेक्टर आणि मुगाचे २.४० हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीचे क्षेत्र मोठे असल्याने पावसाच्या खंडाचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. दीर्घ पावसाच्या खंडामुळे हलक्या व मध्यम जमिनीतील उपलब्ध ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी पिकांमध्ये पाण्याचा ताण वाढला असून, आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः सोयाबीनमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहण्याचा धोका आहे. खारपाण पट्ट्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पर्जन्यावर आधारित किंवा पूर्णपणे कोरडवाहू असल्याने प्रदीर्घ पावसाच्या खंडाचा फटका अधिक बसत आहे. स्थिती खालावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाचे नियमित पाहणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नियमित पाहणी करावी. पिकांची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि उपलब्ध साधनसामुग्री यांचा विचार करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील पीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे. तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भातकुली उत्कर्षा भोसले आणि मंडळ कृषी अधिकारी टाकरखेडा संभू अमोल सराड यांनी केले आहे. भातकुली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला असून, सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत येथे शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
Source link
खारपाणपट्ट्यातील कोरडवाहू शेती संकटात:खरीप पिकांची स्थिती खालावली, सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटावेटर