Headlines

पुढच्या वर्षी लवकर या!:राज्यभरात अनंत चतुर्दशीचा अभूतपूर्व उत्साह, मुंबई-पुण्यात ढोल-ताशांचा गजर; 5 कोटी भाविक रस्त्यावर




गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. 5 कोटी भाविक रस्त्यावर; उत्सवाची ऐतिहासिक भव्यता आजचा विसर्जन सोहळा किती भव्य आहे, याची प्रचिती आकडेवारीवरूनच येते. राज्यभरात आज जवळपास 50 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त घरगुती बाप्पांना निरोप दिला जात आहे. या मिरवणुका पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे 5 कोटी भाविक रस्त्यावर उतरण्याचा अंदाज आहे. हा आकडा आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणासारख्या देशातील 19 मोठ्या राज्यांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मोठा असून, महाराष्ट्राच्या या लोकउत्सवाची भव्यता जगाचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईत 25 हजार जवानांचा कडक पहारा, 383 कृत्रिम कुंड सज्ज राज्याची राजधानी मुंबईत चौपाटी, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक जलस्रोतांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे 25 हजारांहून अधिक जवान आणि अधिकारी रस्त्यावर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सोबतच ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सागरी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) यंदा विशेष खबरदारी घेत शहरात ३८३ कृत्रिम तलाव (Artificial Ponds) तयार केले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उत्सवात दीड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या कालावधीत मुंबईत आतापर्यंत तब्बल १,६३,३८६ गणेशमूर्तींचे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विसर्जन पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात जल्लोष मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातही विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरात सुमारे ९५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि ३ लाखांहून अधिक घरगुती गणपतींचे आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन केले जाणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापुरातही सकाळपासूनच मिरवणुकांचे मार्ग भाविकांनी फुलून गेले आहेत. या महाउत्सवाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी खालील ब्लॉग पाहा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *