![]()
अकोला बारा दिवस चाललेल्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी (दि. २५) गणरायाला निरोप दिला जाणार आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून यंदाचा उत्सव साजरा केला. अकोल्यातील शोभायात्रेला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. यंदा मिरवणुकीत ७० ते ७५ गणेश मंडळे व ७ आखाड्यांचा समावेश होण्याचा अंदाज आहे. तब्बल १४ ते १५ तास मिरवणूक चालणार आहे. अकोल्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला तब्बल १३३ वर्षांची परंपरा आहे. यंदा मिरवणुकीत ७० ते ७५ सार्वजनिक गणेश मंडळे, सात आखाडे सहभागी होणार आहेत. मिरवणुकीला जयहिंद चौकातून सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मानाच्या श्री बाराभाई गणपतीची पूजा व आरती करण्यात येईल. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होईल. यंदा मिरवणुकीत ८ ते १० मंडळांची भर पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १ हजार ९८४ ठिकाणी श्रीगणेशाची स्थापना केली आहे. यामध्ये १ हजार २४४ ग्रामीण, तर ७४० शहरी मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २६८ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवण्यात आला. ^यंदाही गणेश मंडळ उत्सव समितीने नियोजन केले आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० मंडळांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे. गणेशभक्तांनी मिरवणुकीत पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. – अॅड.मोतीसिंग मोहता, अध्यक्ष- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी होणार मिरवणूक मिरवणूक जयहिंद चौकातून पुढे वीर हनुमान चौक, जनता बँक, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, मोहम्मद अली चौक आणि गांधी चौक मार्गे सिटी कोतवालीजवळील गणेश घाट येथे पोहोचेल. तेथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात होऊन ती सुमारे १४ ते १५ तास चालण्याची शक्यता आहे. शेवटच्या गणेश मंडळाच्या श्री गणपतीचे विसर्जन रात्री २ वाजता होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २,५०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. ‘एसआरपीएफ प्लाटून’, ‘क्यूआरटी’ प्लाटून, होमगार्ड, स्ट्रेकिंग फोर्स तैनात असणार आहे. ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. ११२ वर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक चांडक यांनी केले.
Source link
मिरवणुकीत 75 मंडळे, 7 आखाडे सहभागी:अकोल्यात गणेशोत्सवाला 133 वर्षांची परंपरा, मिरवणुकीवर ‘सीसीटीव्ही’, ड्रोनची नजर