![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा नियमबाह्य वापर करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उच्च न्यायालय, मुंबई आणि राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधितांविरोधात एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत डॉल्बी सिस्टीमसह मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने असा तब्बल 2 कोटी 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांकडून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने डॉल्बीचा वापर करू नये, तसेच मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्त्यावर पादचारी आणि वाहनधारकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेश मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित डॉल्बी मालक, वाहनचालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. आधीच बजावल्या होत्या नोटिसा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस दलाला दिले होते. त्यानुसार सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गणेश मंडळे तसेच डॉल्बी मालकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. नियमांचे उल्लंघन करून कोणताही दखलपात्र अपराध घडू नये, यासाठी पोलिसांनी संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमभंग झाल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. डॉल्बीसह वाहने जप्त या कारवाईमध्ये डॉल्बी मालकांसह ट्रॅक्टर, ट्रक आणि टेम्पो चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्त्यावर मिरवणुकीमुळे पादचारी तसेच वाहनधारकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. जय शिवराय मित्र मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, शाहूपुरी गणेश मंडळ, विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ, श्रियश गणेशोत्सव मंडळ, सुयोग गणेशोत्सव मंडळ, एकता गणेशोत्सव मंडळ, बालस्मृती गणेश मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, शिवनगर गणेशोत्सव मंडळ, शिवतेज गणेशोत्सव मंडळ, बाल गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ आणि भोसलेनगर गणेशोत्सव मंडळाशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. कोणावर झाली कारवाई? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय शिवराय मित्र मंडळ, भैरवनाथ मंदिराजवळ, करंजे येथील केतन प्रविण वाघ आणि अनुज विलास फाळके यांच्यावर कारवाई झाली. यातील वाघ हे ट्रॅक्टर चालक असून फाळके हे डॉल्बी मालक आहेत. नवरत्न गणेशोत्सव मंडळ, करंजे येथील रविंद्र राजेंद्र जाधव यांच्यावर ट्रक चालक म्हणून, तर शुभम शहाजी बाकले यांच्यावर डॉल्बी मालक म्हणून कारवाई करण्यात आली. अष्टविनायक गणेश मंडळ, दौलतनगर येथील जुनैद दाऊद शेख आणि प्रमोद चंद्रकांत औंधकर यांच्यावर अनुक्रमे ट्रॅक्टर चालक आणि डॉल्बी मालक म्हणून कारवाई करण्यात आली. शाहूपुरी गणेश मंडळ, शाहूपुरी चौक येथील जय अर्जुन इंगवले आणि प्रदिप नारायण देवरुखे यांच्यावरही कारवाई झाली. इंगवले हे टेम्पो चालक असून देवरुखे डॉल्बी मालक आहेत. विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ, खेड येथील आदेश अरुण निकम आणि अमित ज्ञानेश्वर पवार यांच्यावर कारवाई करण्यात आली. श्रियश गणेशोत्सव मंडळ, केसरकरपेठ येथील सुरज मुगूटराव कदम यांच्यावर डॉल्बी व टेम्पो मालक म्हणून कारवाई करण्यात आली. सुयोग गणेशोत्सव मंडळ, पायथा ग्रुप येथील विलास दादा शिर्के आणि जिवन तुकाराम शिर्के यांच्यावर कारवाई करण्यात आली. यातील एक टेम्पो चालक तर दुसरा डॉल्बी मालक असल्याचे पोलिसांनी नमूद केले. एकता गणेशोत्सव मंडळ, करंजे येथील पियुष गौरव सावंत आणि साहिल राजेंद्र बर्गे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तसेच बालस्मृती गणेश मंडळ, केसरकरपेठ येथील विशाल राजेंद्र धनावडे आणि रजनीकांत चंद्रकांत नागे, संघर्ष मित्र मंडळ, सदरबझार येथील दिपक बाबर आणि उमाकांत चंद्रकांत नागे, शिवनगर गणेशोत्सव मंडळ, मोरे कॉलनी येथील भरत प्रविण जाधव आणि माणिक पोपट शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवतेज गणेशोत्सव मंडळ, बुधवारपेठ येथील स्वप्नील सुर्यकांत देशमुख आणि सुमित रमेश संकपाळ, बाल गणेश तरुण मंडळ, रविवारपेठ येथील संदिप चंद्रकांत नलवडे आणि शुभम ज्ञानदेव खरात यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ, यादोगोपाळपेठ येथील परशुराम चंद्रम वलीकर आणि प्रतिक सुनिल माने यांच्यावर, तर भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ, भोसलेमळा येथील नितीन यशवंत भोसले, हिमेश रमेश जाधव आणि स्ट्रक्चर तयार करणारे अविष्कार अमोल सुतार यांच्यावर कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सातारा पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. पूर्वसूचना देऊनही नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. डॉल्बीचा नियमबाह्य वापर तसेच सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. हेही वाचा…. ‘विरोधकांना सुबुद्धी येवो, कुबुद्धीचे विसर्जन होवो’:गणरायाकडे मुख्यमंत्री फडणवीसांची खास मागणी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर ऋतू तावडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा देताना राजकीय विरोधकांवरही मिश्कील टिप्पणी केली. सविस्तर वाचा….
Source link