![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी चालकांवर उगारलेल्या कारवाईच्या बडग्यावरून साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ध्वनिमर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी डॉल्बी साहित्य जप्त केल्यानंतर संतप्त डॉल्बी चालकांनी थेट खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेत कैफियत मांडली. यावेळी उदयनराजेंनी डॉल्बी चालकांची आक्रमकपणे पाठराखण करत प्रशासनाला थेट जाब विचारला. “तरुणांकडे रोजगार नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते डॉल्बीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नोकऱ्या असत्या तर त्यांनी हा व्यवसाय केला असता का?” असा सवाल करत जप्त केलेले साहित्य सोडवण्यासाठी स्वतः पोलीस प्रशासनाकडे जाणार असल्याचे उदयनराजेंनी जाहीर केले. दुसरीकडे, नियमांचे उल्लंघन नसताना नाहक कारवाई झाली असल्यास चौकशी केली जाईल, अशी सावध भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आहे. रोजगारावर गदा आणू नका; जप्त साहित्य सोडवणार; उदयनराजेंची फटकेबाजी कारवाईमुळे हताश झालेल्या डॉल्बी मालक आणि चालकांनी उदयनराजेंच्या जलमंदिर निवासस्थानी जाऊन व्यथा मांडली. त्यावर उदयनराजे म्हणाले, “सध्या सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेक तरुण कर्ज काढून डॉल्बी आणि साउंड सिस्टीमचा व्यवसाय करतात. सणासुदीच्या काळातच त्यांचा हा व्यवसाय चालतो.” “अशा प्रकारे ऐन सणात साहित्य जप्त करून त्यांच्या रोजीरोटीवर गदा आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे साहित्य सोडवण्यासाठी आपण स्वतः पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारणार आहोत.” व्हिडिओ कॉलवरून कॉलर उडवत शुभेच्छा दरम्यान, मिरवणुकीत प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने उदयनराजेंनी व्हिडिओ कॉलवरून सातारा शहरातील गणेशभक्तांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी आपल्या खास आणि लोकप्रिय शैलीत कॉलर उडवत तरुणाईला दाद दिली. त्यांच्या या स्टाईलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नियमभंग नसेल तर चौकशी करू; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे संकेत डॉल्बी कारवाईवरून निर्माण झालेल्या वादावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संतुलन साधणारी भूमिका मांडली. “कायद्याचे आणि नियमांचे पालन सर्वांनीच केले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मात्र, जर एखाद्या डॉल्बी चालकाने आवाजाच्या नियमांचे उल्लंघन केलेले नसतानाही त्याच्यावर कारवाई झाली असेल, तर अशा प्रकरणांची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांना अथवा व्यवसायिकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘नॉईज लेव्हल मशीन’द्वारे तपासणी, गुन्हे दाखल दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण विषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. आमगाव पोलिसांनी ‘नॉईज लेव्हल मशीन’च्या साहाय्याने प्रत्यक्ष आवाजाची तीव्रता तपासून ४ डीजे चालकांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात ‘ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०००’ मधील नियम ५ सह, नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) मधील कलम २२३ (सरकारी आदेशाचा अवमान), २७० (सार्वजनिक उपद्रव) आणि २९३ अन्वये एकूण ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून साहित्य जप्त करण्यात आले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि पोलिसांची कायदेशीर कारवाई या संघर्षामुळे साताऱ्यात पोलीस प्रशासन विरुद्ध डॉल्बी चालक असा नवा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. —————————— हेही वाचा… विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर ‘सी शोअर शाइन 2026’: अजय देवगण, अमृता फडणवीस आणि पालिका आयुक्तांकडून स्वच्छता मोहीम गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर साचलेला कचरा व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रसिद्ध जुहू चौपाटीवर ‘दिव्यज फाऊंडेशन’, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी शोअर शाइन २०२६’ या विशेष बीच क्लीन-अप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सामाजिक कार्यकर्त्या व दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, दिविजा फडणवीस यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चौपाटीवर उतरून श्रमदान केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
साताऱ्यात डीजे जप्तीवरून उदयनराजे भडकले:नोकऱ्या असत्या तर डॉल्बी वाजवली असती का?; साहित्य सोडवायला स्वतः जाणार; शंभूराज देसाईंकडून चौकशीची ग्वाही