![]()
महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जिल्हा शाखेच्यावतीने आगामी ३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषदेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मंदिर विश्वस्त व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील श्री समर्थ सोटागीर महाराज संस्थान येथे पार पडली.
.
मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण, पारदर्शक व्यवस्थापन तसेच मंदिर विश्वस्तांचे संघटन अधिक सक्षम करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत तिवसा तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिक सहभागी झाले. बदलत्या परिस्थितीत मंदिरांच्या मालमत्ता व देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण, महसूल नोंदींची जपणूक, मंदिर व्यवस्थापनातील पारदर्शकता, कायदेशीर बाबी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी प्रभावी समन्वय याबाबत उपस्थितांनी आपले अनुभव व सूचना मांडल्या.
मंदिर विश्वस्तांची महापरिषद अमरावती येथील एकविरा मंगल कार्यालय (जनार्दन पेठ) येथे होणार आहे. दरम्यान राज्यस्तरीय परिषदेमध्ये मंदिरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, मार्गदर्शन आणि संघटनात्मक विषयांवर विचारविनिमय होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तिवसा तालुक्यातील मंदिरांचे प्रश्न एकत्रितपणे मांडण्यासाठी, परस्पर समन्वय वाढविण्यासाठी आणि मंदिर संघटनेचे कार्य गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील काळात सातत्याने प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. ‘एक मंदिर-एक संघटन-एक दिशा’ या संकल्पनेतून मंदिरांचे संरक्षण, संवर्धन आणि सक्षम व्यवस्थापनासाठी सर्व विश्वस्तांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीच्या माध्यमातून तिवसा तालुक्यातील मंदिर विश्वस्तांमध्ये परस्पर संवाद व समन्वयाला चालना मिळाली असून, मंदिरांच्या विविध समस्या संघटितपणे शासन व संबंधित प्रशासनासमोर मांडण्यासाठी पुढील काळात ठोस कृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीसाठी अनिल काळमेघ, अनिल मापले, विजय करडे व मनोहर कसर यांनी विशेष सहकार्य केले.