अनुसूचित जातींच्या (SC) 13 टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा प्रवर्गांत उपवर्गीकरण करण्याच्या ऐतिहासिक मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 5 लाख मातंग बांधवांचा महामोर्चा धडकण्यापूर्वीच पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना स्थानबद्ध करून रोखण्याचा प्रयत्न
.
सकाळी 7 वाजता स्थानबद्धतेची कारवाई; बोरीवली कोर्टात जाताच पोलिसांची माघार
सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानावर पुकारण्यात आलेल्या विराट आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी निघण्यापूर्वीच सकाळी 7 वाजता कस्तुरबा मार्ग पोलिसांनी रमेश कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना स्थानबद्ध केले होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत त्यांना आंदोलनात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींची माहिती स्वतः रमेश कदम यांनी दिली. “सकाळी मला पोलिसांनी घरातच स्थानबद्ध केले होते. या मनमानी कारवाईविरोधात माझे वकील तातडीने बोरीवली न्यायालयात गेले.”
“न्यायालयात माझे वकील अर्ज दाखल करत असतानाच इकडे पोलिसांना आणि मला वरिष्ठ पातळीवरून फोन आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ‘तुम्ही जाऊ शकता’ असे सांगत माझी सुटका केली.”

माजी आमदार रमेश कदम यांना स्थानबद्ध करण्यासाठी पोलिस आलेले असताना.

थेट आझाद मैदानाकडे कूच
“मी आता मातंग समाजाच्या आरक्षणाचा अधिकृत जीआर घेण्यासाठी थेट आझाद मैदानाकडे निघालो आहे. समाजातील तरुणांनी जराही मागे न हटता मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय अण्णाभाऊ!” असे भावनिक व लढाऊ आवाहन त्यांनी केले.
8 वर्षे तुरुंगात काढली, पण लढा थांबणार नाही; कदम यांचा सरकारला इशारा
स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर कदम यांनी समाजाच्या न्याय्य हक्कांवर ठाम भूमिका मांडली. “मातंग समाजाला उपवर्गीकरणातून स्वतंत्र वाटा मिळवून देण्यासाठी ‘क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगा’ने सप्टेंबर 2008 मध्ये 82 शिफारशींचा सर्वसमावेशक अहवाल शासनाला दिला होता. त्यापैकी ६८ शिफारशींना राज्य मंत्रिमंडळाने मान्यताही दिली होती. तरीही आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही.”
आवाज दाबण्याचा प्रयत्न निष्फळ
“माझ्या आयुष्यातील तब्बल आठ वर्षे अंडरट्रायल कैदी म्हणून तुरुंगात गेली. त्यामुळे या निर्णयासाठी रस्त्यावर उतरून समाजासोबत लढण्याची संधी माझ्याकडून हिरावली गेली. मात्र आजही माझी भूमिका तीच आहे. मला घरात कोंडून समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला आता न्यायालयाच्या आणि जनरेटाच्या ताकदीने उत्तर मिळाले आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
जीआर घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही!
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्र सरकारकडून शासन निर्णय काढण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात मातंग समाजात प्रचंड संताप आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून हजारो वाहनांच्या ताफ्यासह लाखो समाजबांधव मुंबईच्या दिशेने दाखल होत आहेत. जोपर्यंत राज्य सरकार उपवर्गीकरणाचा अधिकृत जीआर हातात देत नाही, तोपर्यंत आझाद मैदान रिकामे करणार नाही आणि मुंबई सोडणार नाही, असा निर्धार आंदोलक नेत्यांनी केला आहे. रमेश कदम यांची सुटका झाल्याने आणि ते स्वतः मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
———
हेही वाचा…
आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचणार:राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद, ठाकरे बंधूंचा मोर्चा हुकूमशाहीविरुद्ध!; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्येही थेट संवाद सुरू असून, विरोधी पक्षांची ही एकजूट देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असा मोठा खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी