Headlines

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला वरुणराजाचा दिलासा?:4-5 दिवसांत परतीचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार सरींचा इशारा




ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने महाराष्ट्रातील 75 टक्के भागावर कोरड्या दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असतानाच, हवामान खात्याने राज्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी दिली आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कर्नाटक ते तामिळनाडूदरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. हवामान प्रणालीतील बदल: चक्रीय वारे आणि कमी दाबाचा पट्टा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून मान्सूनने अधिकृतरीत्या माघार घेतली आहे. अरबी समुद्रात 1.5 ते 4.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर, कर्नाटकपासून तामिळनाडूपर्यंत सुमारे ९०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. या दोन्ही हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहत असून पावसासाठी पूरक स्थिती बनली आहे. राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांतही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, ज्यामुळे करपणाऱ्या पिकांना आणि रब्बीच्या मशागतीला तात्पुरता का होईना जीवदान मिळू शकेल. दरम्यान, राज्यात कमाल तापमानात वाढ नोंदवली जात असताना महाबळेश्वर येथे नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ‘ऑक्टोबर हीट’चा चटका बसणार; 1 ऑक्टोबरपासून उकाडा वाढणार पावसाच्या सरी दिलासा देणार असल्या, तरी ऑक्टोबरच्या सुरुवातीला कडक उन्हाचा आणि उकाड्याचा तडाखाही सहन करावा लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिवस आणि रात्रीचे (कमाल व किमान) तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 ते 8 ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता अधिक जाणवेल. त्यानंतर 9 ते 22 ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या इतर भागांमध्येही उष्णतेचा पारा चढाच राहण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचे गणरायाला साकडे दुष्काळाची दाहकता इतकी तीव्र आहे की विहिरी, बोअरवेल आणि धरणांमधील पाणी आटल्याने उभी पिके डोळ्यांदेखत जळून खाक झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत तालुक्यासह विविध भागांतील शेतकऱ्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे जाऊन विघ्नहर्त्याला साकडे घातले. “शेतात पाण्याचा थेंब नाही, उभं पीक करपून गेलंय; आता तरी गणरायाने कृपादृष्टी करावी आणि राज्यात चांगला पाऊस पाडावा,” अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला हा परतीचा पाऊस प्रत्यक्षात बरसला, तर राज्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि आगामी रब्बी हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतजमीन तयार करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *