“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञाने
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा ऐतिहासिक संयुक्त मोर्चा, आज होणारी ‘इंडिया’ आघाडीची बैठक, शरद पवारांची राजकीय भूमिका, दुष्काळात राज्यावर वाढणारे कर्ज आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सविस्तर आणि रोखठोक भाष्य केले.
4 ऑक्टोबरच्या आत निर्णय होणार नाही; जनआंदोलनाचा देशव्यापी भडका उडेल
निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची तीव्रता स्पष्ट करताना राऊत म्हणाले, “यापूर्वी ठाकरे बंधूंनी हिंदी भाषेची सक्ती आणि नंतरच्या आंदोलनांत एकत्र भूमिका घेतली होती. आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानीविरोधात हे तिसरे संयुक्त आंदोलन उभे राहिले आहे. 4 ऑक्टोबरच्या आत सरकार नमणार नाही; मात्र आंदोलनाची धग जसजशी दिल्लीपर्यंत पोहोचेल, तसतसे सरकारला पावले उचलावीच लागतील.”

देशव्यापी आंदोलनाची साखळी
“2 ऑक्टोबरला मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे आंदोलन होत आहे. 4 ऑक्टोबरला मनसे आणि शिवसेना (UBT) यांचा विराट जनमोर्चा निघणार आहे. देशभरात हे वातावरण पेटत जाणार असून ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरणार नाही.”
राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद; ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत डिजिटल सहभाग
‘इंडिया’ आघाडीच्या आगामी रणनीतीवर बोलताना त्यांनी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी उघड केल्या, “राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद सुरू आहे, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी चर्चा करत आहेत. राहुल गांधींनी छेडलेल्या लढ्याचाच हा एक मोठा भाग आहे. ममता बॅनर्जीही आता इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होत आहेत, कारण पश्चिम बंगालमधील घडामोडींनंतर सर्वांना एकत्र राहण्याचे महत्त्व समजले आहे.”
बैठकीत डिजिटल सहभाग
“आज दुपारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या राष्ट्रीय बैठकीचा मुख्य अजेंडा ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाचा कारभार हाच आहे. ४ ऑक्टोबरच्या मुंबईतील महामोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे आणि आम्ही मुंबईत असल्याने, दुपारी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (डिजिटल माध्यमातून) या बैठकीला उपस्थित राहणार आहोत.”
शरद पवार महाविकास आघाडीचे भक्कम स्तंभ; अफवांवर विश्वास ठेवू नका
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांचा समाचार घेत ते म्हणाले, “शरद पवार यांनी कालच स्पष्ट केले आहे की ते कुठेही जाणार नाहीत. पवार साहेब हे इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. साखर कारखाने, सहकार किंवा कौटुंबिक विषयांवर चर्चा होत असतात, त्यात आम्ही राजकारण आणत नाही. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीविरोधात खंबीर उभा आहे.”
खासदार सुनील तटकरे यांच्या विधानावर टीका करताना राऊत म्हणाले, “अजित पवारांचा पक्ष हा मूळचा पक्ष राहिला नसून तो पूर्णपणे अमित शाह यांच्या मर्जीवर चालणारा पक्ष आहे. अमित शाह नसतील तेव्हा आपल्या पक्षाचे काय होईल, याचे चिंतन त्यांनी संघ कार्यालयाजवळ बसून करावे.”
खर्च जनतेने नव्हे, सरकारने कमी करावा; आमदारांची खरेदी थांबवा!
राज्यावर आधीच 11 लाख कोटींचे कर्ज असताना दुष्काळी मदतीसाठी सरकार पुन्हा कर्ज काढण्याच्या तयारीत असल्याच्या मुद्द्यावर राऊत भडकले, “सरकार जनतेला खर्च कमी करायला सांगते; पण जनतेकडे खर्च करायला पैसे ठेवलेत कुठे? 50-75-100 कोटींना आमदार, खासदार विकत घेणे, चार्टर्ड विमानांनी दिल्लीच्या वाऱ्या करणे आणि कंत्राटदारांकडून 40 टक्के कमिशन उकळणे हे खर्च आधी मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी थांबवावेत.”
आत्महत्येचे पातक फडणवीसांच्या माथी
“लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 90 लाख बोगस लाभार्थ्यांना आणि पुरुषांनाही पैसे वाटून तिजोरी लुटली गेली. आता कर्ज काढून सण साजरे करायचे आणि दुष्काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचे, हा कोणता न्याय? पैशांअभावी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास त्याचे पातक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माथी बसेल.”
तुकाराम मुंढेंना थेट आव्हान- बंद खोलीत 100 व्यापाऱ्यांना बोलवा, वसुली उघड होईल
एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना लिहिलेल्या पत्राबाबत खुलासा करताना राऊत म्हणाले, “मी स्वतः तुकाराम मुंढेंना सोशल मीडियावर टॅग केले आहे आणि त्यांच्या कार्यालयातही पत्र पोहोचले आहे. त्यांनी कार्यालयात बसून लोकप्रतिनिधींचा पत्रव्यवहार तपासला पाहिजे.”
मुंढेंवर नव्हे, यंत्रणेतील वसुलीवर आक्षेप
“माझा वैयक्तिक आरोप तुकाराम मुंढेंवर नाही, ते प्रामाणिकपणे काम करत असतील; पण त्यांच्या पाठीमागे काय सुरू आहे ते त्यांनी पाहावे. धाडी पडल्यानंतर दूध डेअरी चालक आणि व्यापाऱ्यांकडे 20-25 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे 250 ते 300 लोकांनी मला फोन करून सांगितले आहे. भ्रष्टाचाराचे कोणी कागदी पुरावे ठेवत नाही. मुंढेंनी बंद खोलीत त्या 100 व्यापाऱ्यांना बोलावून ‘वन टू वन’ चर्चा करावी, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा सर्व प्रकार समोर येईल.” टी. एन. शेषन यांच्याप्रमाणे केवळ नियमांची व आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून पारदर्शक कारभार केला पाहिजे, अघोरी पद्धतीने नागरिकांना वेठीस धरू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी शेवटी दिला.
—————————-
हेही वाचा…
दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला वरुणराजाचा दिलासा?:4-5 दिवसांत परतीचा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार सरींचा इशारा

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने महाराष्ट्रातील 75 टक्के भागावर कोरड्या दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असतानाच, हवामान खात्याने राज्यातील बळीराजासाठी दिलासादायक बातमी दिली आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कर्नाटक ते तामिळनाडूदरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी