![]()
लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा मोर्चा राज्यभर गाजत आहे. भाजपने या मोर्चासाठी रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, वरळी पोलिसांनी परवानगी देताना काही कडक अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या होत्या. मंगळवारी झालेल्या या मोर्चात या अटींचे पालन झाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या आधारावर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. मंत्री गिरीश महाजन यांना विचारला जाब या मोर्चादरम्यान वरळीत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. भररस्त्यात अडकलेल्या एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर जाऊन “तुमच्या आंदोलनामुळे सामान्य लोकांचे हाल का?” असा रोकडा सवाल विचारला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सर्वसामान्यांच्या रोषाची ही झलक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रथम नागरिक म्हणून रितू तावडेंची दिलगिरी वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांची गैरसोय झाल्याबद्दल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित असून सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काढण्यात आला होता. नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून योग्य नियोजनही करण्यात आले होते. तरीही काही लोकांना त्रास झाला असेल तर मी मुंबईची प्रथम सेविका म्हणून दिलगिरी व्यक्त करते,” असे महापौर म्हणाल्या. गिरीश महाजांना जाब विचारणाऱ्या महिलेबद्दल प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिलगिरी व्यक्त करतानाच मोर्चाचे समर्थनही केले. “नारीशक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून महिलांचे राजकीय हक्क हिरावणाऱ्यांविरुद्ध हा आमचा ठाम लढा आहे. तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हा केवळ आंदोलन नव्हता- हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा, आमचा रोष ‘ती’ भगिनी आणि सर्व नागरिक समजून घेतील,’ असा विश्वास रितू तावडे यांनी व्यक्त केला. हे ही वाचा… गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया:म्हणाले – सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, तिने पोलिसांशीही अरेरावी केली मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल ते बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
Source link
वरळीतील जनआक्रोश मोर्चा भाजपच्या अंगलट:नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटी-शर्तींच्या पायमल्लीचा ठपका