Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:आकलेत हप्त्याच्या वादातून हॉटेलवर धुडगूस; लाकडी दांडके, लोखंडी रॉड, कोयत्याने तोडफोड




आकले (ता. जि. सातारा) येथील साईसागर हॉटेलमध्ये हप्ता मागण्याच्या कारणावरून २५ ते २८ जणांच्या जमावाने धुडगूस घालत हॉटेलची तोडफोड केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री घडली. लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि कोयता घेऊन आलेल्या जमावाने टेबल, खुर्च्या, वाहने व अन्य साहित्याची तोडफोड करून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर साईसागर हॉटेल येथील पानटपरीवर पान खाण्यासाठी गेलेल्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची दुसरी तक्रारही सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. हॉटेल व्यावसायिक निलेश रामचंद्र सुळके (वय ३६, रा. आकले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सर्व आरोपी साईसागर हॉटेलमध्ये आले. ‘हॉटेलचा हप्ता सुरू करा’ अशी मागणी करत त्यांनी बेकायदेशीर जमाव जमविला. त्यानंतर सोबत आणलेल्या लाकडी दांडक्यांनी, लोखंडी रॉड आणि कोयत्याने हॉटेलची तोडफोड केली. तसेच धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जमावाने हॉटेलमधील टेबल, खुर्च्या, वाहने आणि अन्य साहित्याची तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी बाळू गोळे, संग्राम पवार, तुषार पवार, अनिकेत अनपट, आर्यन गोळे, कैलास सावंत, रोशन पवार, अभय पवार, सर्वेश कुराणे, सुशांत अनपट, गणेश शेलार, विशाल जंगम आणि इतर १० ते १५ जण (सर्व रा. आकले) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत. दरम्यान, अभय संतोष पवार (वय २४, रा. चिंचणी, ता. जि. सातारा) यांनी दिलेल्या दुसऱ्या फिर्यादीनुसार, ते ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साईसागर हॉटेल येथील पानटपरीवर पान खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी आकाश सुळके, निलेश सुळके आणि अस्मित सुळके (सर्व रा. आकले) यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी आकाश सुळके याने कोयत्याने तसेच निलेश आणि अस्मित या दोघांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी आकाश सुळके, निलेश सुळके आणि अस्मित सुळके यांच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार विद्या कुंभार आणि पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत. जुन्या वादातून पानशॉपवर कोयत्याचा धाक! राज्यपाल गणपतराव तपासे पथावरील सिटी वाईनसमोर असलेल्या नागेश पानशॉपमध्ये जुन्या वादाच्या कारणावरून चौघांनी धुडगूस घालत दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने दुकानातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याबाबत नागेश राजू कांबळे (वय २५, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नागेश कांबळे व त्यांचा मित्र प्रसाद पोळ हे दुकानाची आवराआवर करीत असताना आरोपी श्री जाधव, अक्षय शिवगण, राज शिवगण, जावेद सय्यद व अन्य आरोपी तेथे आले. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रावर कोयत्याचा धाक दाखविला. त्यानंतर लाकडी दांडक्याने दुकानातील साहित्याची तोडफोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. यावेळी एका आरोपीने प्रसाद पोळ यांच्या उजव्या मांडीवर कोयता फेकून मारल्याने ते जखमी झाले. तसेच चौघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, अक्षय शिवगण याने फिर्यादीच्या खिशातील १६ हजार रुपये काढून घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी श्री जाधव, अक्षय शिवगण, राज शिवगण (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. रविवार पेठ, ता. जि. सातारा) आणि जावेद सय्यद (पूर्ण नाव माहित नाही, रा. सदर बाजार, सातारा) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत. अल्पवयीन मुलीचा पाठलाग; कोयता घेऊन घरी येत धमकी! अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचा स्कुटीवरून पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तसेच कोयता घेऊन घरी येत धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सचिन साळुंखे व जालिंदर साळुंखे हे स्कुटीवरून तिचा पाठलाग करून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. याबाबत पीडितेने तिची बहिणीला सांगितल्यानंतर सचिन साळुंखे याने तिला चापट मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर तो हातात कोयता घेऊन पीडितेच्या घरी आला. त्यावेळी पीडिता, तिच्या दोन्ही बहीण घरात होत्या. आरोपीने ‘माझी बदनामी कोण करतोय, कुणाला सोडणार नाही,’ अशा शब्दांत धमकी दिली.या प्रकारानंतर पीडितेने आपले मानलेले भाऊ श्रेयश संतोष पवार (वय २२), क्षितीज संतोष पवार (वय २१) आणि श्रृषीकेश गणेश त्रिगुणे (वय २२), सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा, यांना फोन करून बोलावून घेतले. श्रेयश याने सचिनला फोन केला असता त्याचा भाऊ आरोपी जालिंदर साळुंखे तेथे आला. त्याने ‘माझ्या भावाने काही केले नाही, तो तुमची माफी मागणार नाही,’ असे सांगितले.त्यानंतर सचिन तेथे आला आणि त्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून श्रृषीकेश त्रिगुणे यांच्या डोक्याच्या पाठीमागील डाव्या बाजूस मारून त्यांना जखमी केले आहे.या प्रकरणी सचिन साळुंखे आणि जालिंदर साळुंखे (पूर्ण नाव व पत्ता पोलिस तपासात स्पष्ट होणार) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड करीत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध केल्याचा तसेच वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन करून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ऑगस्ट २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याबाबत १६ वर्षीय पीडितेने १ ऑक्टोबर रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, प्रतीक इंदलकरला पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही, घरात कोणी नसताना ९ ऑगस्ट २०२५ रोजी तसेच त्यानंतर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले आहे. तसेच दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासह मांढरदेवी येथे दर्शनासाठी जात असताना एका नातेवाईकांकडे थांबले होते. त्यावेळी वाहनात कोणी नसताना समीर उमराणीकर याने पीडितेला जवळ ओढून चुंबन करण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी गैरवर्तन केले आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय ऑगस्ट २०२६ मध्ये साईश पवार याने रूम दाखविण्याच्या बहाण्याने पीडितेला सोबत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी प्रतीक इंदलकर (रा. कळंबे, ता. जि. सातारा), समीर उमराणीकर आणि साईश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतीक इंदलकर याला ताब्यात घेऊन अटक केली असून, समीर उमराणीकर आणि साईश पवार यांचा शोध सुरू आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *