![]()
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील नदीपात्रात आढळलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आर्थिक वादातून तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना हडपसर परिसरातून पकडले गेले. खून झालेल्या तरुणाचे नाव कुशल कसबे (वय 42, रा. महात्मा फुले पेठ) आहे. त्याचा मृतदेह रविवारी (19 एप्रिल) डेक्कन जिमखाना भागातील नदीपात्रात आढळला होता. कसबेच्या गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती, मात्र पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटवली. पोलिस शिपाई आकाश सोनवणे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. पोलिसांनी कसबेच्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांची चौकशी केली, तसेच डेक्कन जिमखाना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान, आरोपी ओंकार कांबळेने आपली दुचाकी हडपसर परिसरात पार्क केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या दुचाकीचा शोध घेतला असता, त्यावर रक्ताचे डाग आढळले. दुचाकीची डिक्की उघडल्यावर त्यात तीन मोबाईल फोन सापडले. खून केल्यानंतर आरोपी कांबळेने आपले कपडे बदलले होते. तो आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कर्नाटकातील गदग येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. दोघेही हडपसर परिसरात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ओंकार कांबळे (वय 27, रा. धनकवडी) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, कुशल कसबेने आरोपी ओंकार कांबळेकडून 70 हजार रुपये घेतले होते. याच आर्थिक वादातून कसबेचा खून करण्यात आला. डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की,आरोपीची कसून चौकशी सुरू असून, खुनामागचे निश्चित कारण लवकरच स्पष्ट होईल.”
Source link
पुणे नदीपात्रातील खून प्रकरणाचा उलगडा:आर्थिक वादातून तरुणाची हत्या, दोन ताब्यात