Headlines

ओबीसी मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक:‘जातनिहाय जनगणनाच रामबाण उपाय’, राहुल गांधींच्या भूमिकेचे कौतुक, फडणवीसांवर सपकाळ-वडेट्टीवारांचा निशाणा




ओबीसी समाजाच्या हक्कांचा मुद्दा आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व, आरक्षण आणि सामाजिक समतेच्या मुद्द्यावर संघटित होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, खासदार प्रतिभा धानोरकर, प्रवक्ते हनुमंत पवार आदी उपस्थित होते. ‘ओबीसींचा मुद्दा देशात राहुल गांधींनी प्रखरपणे मांडला’ कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेच्या भूमिकेचे समर्थन केले. ओबीसी समाजाचा मुद्दा देशाच्या राजकारणात प्रखरपणे मांडण्याचे काम राहुल गांधी यांनी केले, असा दावा त्यांनी केला. “जातव्यवस्थेमुळे समाजातील विविध जातींमध्ये वाद निर्माण झाले. या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्याचा गैरवापर करण्यात आला. मात्र, आता या व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती आहे, त्यानुसार त्याला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. त्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला,” असे डॉ. प्रसाद म्हणाले. राहुल गांधी यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय जाहीर करावा लागला, असा दावाही त्यांनी केला. ‘जातनिहाय जनगणना हाच आरक्षणावरचा रामबाण उपाय’ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली. राज्यात विविध समाज आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणे आणि जातनिहाय जनगणना करणे हाच प्रभावी उपाय आहे, असे ते म्हणाले. सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले. “आरक्षणाच्या नावाखाली फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावली,” असा आरोप त्यांनी केला. फोडा, तोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती वापरली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण फडणवीस सरकारने पुढे सुरू ठेवले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा दावाही सपकाळ यांनी केला. वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. “ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला, मात्र भाजपने या समाजाला काहीही दिले नाही,” असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी सर्वप्रथम आवाज उठवला आणि त्यांच्या भूमिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली, असे वडेट्टीवार म्हणाले. मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती. हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रातील प्रतिनिधित्वासाठी होते. मात्र, मंडल आयोगाच्या आंदोलनात मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी शिरकाव करून ओबीसी समाजात गैरसमज निर्माण केले, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “मनुवाद्यांनी जातीजातींमध्ये विष पेरण्याचे काम केले. या मनुवादी विचाराला गाडण्याचे काम समतेचा विचारच करू शकतो,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले. ‘ओबीसी समाजाने केवळ मतदान करणारा नव्हे, नेतृत्व करणारा बनावे’ ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांनी मंडल आयोग आणि बी. पी. मंडल यांच्या योगदानाचा उल्लेख केला. देशातील ओबीसी समाजाला राजकीय आणि सामाजिक ओळख मिळवून देण्याचे मोठे काम बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांनी केले, असे ते म्हणाले. ज्या काळात ओबीसी समाजाला स्पष्ट राजकीय चेहरा नव्हता, त्या काळात बी. पी. मंडल यांनी ओबीसी समाजाची आकडेवारी गोळा करून त्यांच्या हक्कांसाठी भूमिका मांडली आणि २७ टक्के आरक्षणाची शिफारस केली, असे भिंगे यांनी सांगितले. “ओबीसी समाज आता केवळ मतदान करणारा राहता कामा नये, तर नेतृत्व करणारा बनला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी काँग्रेसने ‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’ हा संकल्प केला असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ पुस्तकाचे प्रकाशन याच कार्यक्रमात ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ओबीसी समाज, मंडल आयोग, आरक्षण आणि मनुवाद या विषयांबाबत सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनाही माहिती समजावी, या उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आल्याचे प्रा. यशपाल भिंगे यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, जातनिहाय जनगणनेचे महत्त्व समजावून सांगणे आणि सामाजिक समतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातून काँग्रेसने ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले. हेही वाचा… नारायणगडावर पुन्हा लाखोंचा मराठा मेळावा:मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, सरकारसह निवडणूक आयोगावरही हल्लाबोल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांसह निवडणूक आयोगाच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले. दरम्यान, आगामी दसरा मेळाव्याबाबतही जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली असून, यंदाचा दसरा मेळावा नारायणगड येथे नियोजित पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्यासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *