Headlines

वंचित, विशेष मुलांसाठी 'मामाच्या गावची सफर' उपक्रम:सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद




वंचित आणि विशेष मुलांसाठी आयोजित ‘मामाच्या गावची सफर’ या अनोख्या उपक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि पुणेकरांच्या सहभागाने आयोजित या २७व्या वर्षाच्या उपक्रमात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मामाच्या गावी पोहोचताच चिमुकल्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बँडच्या गजरात नाचत, रंगीबेरंगी टोप्या घालून मुलांनी उत्साह दाखवला. बग्गी, उंट आणि घोड्यांची रपेट मारत या वंचित आणि विशेष मुलांच्या स्वागताचा सोहळा रंगला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान या सोहळ्याला अधिक खास बनवून गेले. हा उपक्रम पुढील दोन दिवस चालणार असून, या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार हेमंत रासने, नगरसेवक अजय खेडेकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, सिद्धी शिळीमकर, सई थोपटे, स्नेहा माळवदे, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काकडे, ॲड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, विश्वास भोर, पीयुष शाह, कुमार रेणुसे, सागर घम, राजू कांबळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, सचिन ससाने, मित नानावटी, नमन कांबळे आणि स्वामी महाले यांची उपस्थिती होती. या ‘मामाच्या गावची सफर’ उपक्रमासोबतच दृष्टीहीन जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांच्या वेळापत्रकानुसार, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतर्फे ऑर्केस्ट्राचा विशेष कार्यक्रम आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. २५ एप्रिल रोजी भाचे मंडळींचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. २६ एप्रिल रोजी अंध भगिनींचा विवाह सोहळा संपन्न होईल. विवाह सोहळ्यापूर्वी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडेल. विवाहाचे धार्मिक विधी दुपारी २ वाजता, तर नवरदेवाची वरात सायंकाळी ४.३० वाजता निघणार आहे. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होईल. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते यांनी सांगितले की, अनाथ आश्रमातील मुले-मुली दरवर्षी ‘मामाच्या गावची सफर’ या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात. अनाथ आणि विशेष मुलांना मामाच्या गावी येऊन सुट्टीमध्ये मजा करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला जातो. माहेर – भीमा कोरेगाव, संस्कार बाल आश्रम राशीन, स्नेहप्रेम सामाजिक प्रतिष्ठान कर्जत नगर, संतुलन निवासी पाषाण, बचपन वर्ल्ड फोरम हडपसर आणि आपले घर डोणजे या संस्थांमधील २२५ पेक्षा अधिक मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *