Headlines

‘अजितदादांनंतर भाजपने हावरटासारखं अर्थमंत्रीपद घेतलं, ते सुनेत्रा पवारांना देणार नाहीत’:रोहित पवारांचा दावा, दुष्काळाच्या मदतीवरून सरकारला इशारा




दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थमंत्रीपदावरून राजकीय चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘अजितदादांना भाजप न्याय देऊ शकले नाही आणि त्यांच्या पक्षातील नेतेही न्याय देऊ शकले नाहीत. अजितदादा गेल्यानंतर भाजपने हावरटासारखं अर्थमंत्रीपद घेतलं. ते आता कोणालाही परत देणार नाहीत,’ असा दावा रोहित पवार यांनी केला. भाजपला आपण चांगले ओळखतो, त्यामुळेच त्यांच्यापासून दूर असल्याचेही ते म्हणाले. पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांशी संवाद साधल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘भाजप अर्थमंत्रीपद परत देणार नाही’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून होत असल्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजप अर्थमंत्रीपद परत देणार नसल्याचे सांगत त्यांनी, ‘भाजपने अजितदादांना न्याय दिला नाही. त्यांच्या पक्षातील लोकही त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. अजितदादा गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद घेतले असून, ते आता दुसऱ्याला देणार नाहीत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,’ असे म्हटले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाच्या राजकीय ताकदीचाही मुद्दा उपस्थित केला. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या पक्षाला मिळायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. अजितदादांच्या पक्षाची ताकद कुठेतरी कमी करण्यात आली असून, अर्थखाते देवेंद्र फडणवीस यांनी घेतले; मात्र ते परत मागण्याची धमक त्यांच्या पक्षात नाही, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. ‘शेतकरी आणि शेतमजुरांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही’ राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीवरून रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांना देण्यात आलेली 5 हजार रुपयांची मदत तुटपुंजी असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मोठ्या मदतीची मागणी केली. ‘शेतकरी, शेतमजूर आणि आम्ही सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही,’ असे विधान त्यांनी केले. शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना पुरेशी मदत मिळेपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर राज्यभरातील नागरिकांमध्ये जाऊन आंदोलन उभारण्यात येईल. दिवाळीदेखील लोकांमध्ये जाऊन साजरी केली जाईल. सरकारने लोकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला सवाल शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चावरूनही रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले. या प्रकल्पात 40 हजार कोटी रुपये काढले जाणार असल्याचा आरोप करत त्यांनी हा खर्च थांबवण्याची मागणी केली. महाकुंभातील कथित भ्रष्टाचारावरही संबंधित मंत्र्यांनी बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. ‘शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देताना सरकारला लाज वाटत नाही का?’ असा सवाल करत त्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर आणि खतांच्या किमती वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकार सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे घेत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत कशी होईल, यासाठी आपला संघर्ष सुरू असल्याचे ते म्हणाले. ‘2029 मध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न’ आपण आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 2029 च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बारामतीतील गुन्हेगारी आणि तलाठ्यांकडून पैसे घेऊन कामे केली जात असल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी लक्ष वेधले. बारामतीत गुंडांचा धुमाकूळ सुरू असल्याचे आणि तलाठी पैसे घेऊन काम करत असल्याचे नागरिक सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. पाण्याअभावी उसाचे पीक जळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. ‘अजितदादा असते तर एमपीएससी विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली नसती’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरूनही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार आज असते, तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे ते म्हणाले. एमपीएससीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संबंधित समिती आणि प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील दोन दिवसांत काही विद्यार्थी पुराव्यांसह तुकाराम मुंढे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात वॉचमनपासून अध्यक्षांपर्यंत जो कोणी जबाबदार असेल, त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्षांबाबत प्राथमिक स्तरावर नकारात्मक माहिती मिळाली नसल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अभिजीत दीपके यांच्या अटकेवरून सरकारवर टीका अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक करण्यात आल्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. दीपके यांनी केलेले आंदोलन तिरंगा रॅलीच्या स्वरूपात होते. भाजपचे नेते तिरंगा रॅली काढतात, तेव्हा त्याचे स्वागत केले जाते; मात्र सामान्य नागरिकांनी अशी रॅली काढल्यास त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते, असे ते म्हणाले. ‘सामान्य नागरिकांनी तिरंगा रॅली काढली म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात नेणे अयोग्य आहे. देशात सरकारच्या माध्यमातून हुकूमशाही आणली जात असल्याचे आमचे ठाम मत आहे,’ अशी टीका त्यांनी केली. यापूर्वी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ज्या पद्धतीने ताब्यात घेतले आणि त्यांच्याशी वर्तन केले, त्यामुळे विद्यार्थी घाबरले असतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आंदोलनासाठी परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अभिजीत दीपके हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याच्या आरोपांवर बोलताना रोहित पवार यांनी संविधानाच्या बाजूने आणि देशाच्या हितासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला पाठिंबा देणे चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होणे किंवा त्यांना पाठिंबा देणे यात गैर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवीधर निवडणुकीतील आघाडीच्या भूमिकेवर भाष्य पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात आपण आतापर्यंत सहभागी होऊ शकलो नाही, याचे कारण आंदोलन आणि मतदारसंघातील कामे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मात्र, पुढील दिवसांपासून प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याच्या प्रश्नावर त्यांनी महायुतीतही मतभेद असल्याचे म्हटले. अखेरीस मतदार काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचीही संबंधित विषयावर तीच भूमिका असेल, तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असेही रोहित पवार यांनी सांगितले. एकूणच, अर्थमंत्रीपद, दुष्काळग्रस्तांना मदत, एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि भाजपवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा… ‘महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता’:शिवसेनेतील फुटीवर एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं, महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या निर्णयाचं समर्थन महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अमरावती दौऱ्यात शिवसेनेतील बंडाबाबत भाष्य करताना, आपण धाडसाने निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्र 15 ते 20 वर्षे मागे गेला असता, असे विधान केले. शिवसेनेतील बंड हा ऐतिहासिक निर्णय होता आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे यांनी शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही भूमिका स्पष्ट केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *