Headlines

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचा राष्ट्रीय सन्मान!:रत्नागिरीचे SP नितीन बगाटे यांच्या 'रेड्स' AI प्रणालीचा ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक




छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून कर्तव्य बजावलेले आणि सध्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असलेले नितीन बगाटे यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी विकसित केलेल्या ‘रेड्स’ (RAIDS – Rapid AI driven Investigation and Detection System) या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲपला राष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील ‘सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी’त आयोजित प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत या ॲपने संपूर्ण भारतातून 3 रा क्रमांक पटकावला आहे. देशातील पोलीस दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा हा पहिलाच यशस्वी प्रयोग मानला जात आहे. दहशतवादी स्लीपर सेल आणि गुन्हेगारांवर राहणार वॉच सुरुवातीला बेवारस मृतदेहांची ओळख पटवणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आलेली ही यंत्रणा आता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भविष्यात देशभरातील गुन्हेगारांचा एकच राष्ट्रीय डेटाबेस (National Database) तयार करून फरार आरोपींसह देशात लपलेल्या ‘दहशतवादी स्लीपर सेल्स’चा (Terrorist Sleeper Cells) पर्दाफाश करण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ‘रेड्स’चे मोठे यश पाहून महाराष्ट्र राज्याच्या सीआयडी (CID) विभागाने बेवारस मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आपल्या अधिकृत नियमावलीत (SOP) या ॲपचा समावेश केला आहे. अशी करते काम ही प्रणाली (अचूकता आणि आतापर्यंतचे यश) खराब किंवा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण आव्हान असते. अशा वेळी उपलब्ध भौतिक माहितीच्या आधारे हे ॲप AI च्या साहाय्याने एकाच व्यक्तीच्या चेहऱ्याची सुमारे 108 विविध संगणकीय रूपे तयार करते. तंत्रज्ञांची टीम अन् सहकार्य एसपी नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सहकार्याने ही यंत्रणा विकसित करण्यात आली. या तांत्रिक विकासात पोलीस तंत्रज्ञ अभिजित दळवी तसेच तंत्रज्ञान तज्ज्ञ जितेश जैस्वाल व रितेश जैस्वाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डीसीपी असताना अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उकलणाऱ्या नितीन बगाटे यांच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे देशभरातील पोलीस तपासाला नवी दिशा मिळाली असून छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *